Best fruits for constipation: बद्धकोष्ठता ही केवळ एक समस्या नाही, तर तो शरीराकडून मिळणारा एक संकेत आहे की, तुमची पचनसंस्था योग्यरीत्या काम करीत नाही. जेव्हा मल खूप कठीण होतो आणि पोट पूर्णपणे साफ होत नाही तेव्हा त्या स्थितीला बद्धकोष्ठता, असे म्हणतात. बद्धकोष्ठतेसाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात; जसे की, फायबरचा अभाव, कमी पाणी पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, औषधांचे दुष्परिणाम, वाढत्या वयानुसार चयापचय आणि आतड्यांची शक्ती कमी होणे. बद्धकोष्ठता झाल्यास शरीरात काही लक्षणे दिसू लागतात; जसे की, आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचाला होणे, मल खूप कठीण, कोरडा किंवा ढेकूळ असणे, पोटात नेहमी जडपणा जाणवणे, गॅस व पोट फुगणे. यामध्ये आतड्यांदरम्यान जास्त ताण येणे, जिभेवर पांढरेपणा येणे व तोंडाला दुर्गंधी येणे यांचा समावेश आहे.
जर बद्धकोष्ठतेवर बराच काळ उपचार केले गेले नाहीत, तर ती बाब गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. मूळव्याध, फिशर, हर्निया आणि त्वचेच्या समस्या अपूर्ण आतड्यांमुळे होतात. वयाच्या ५० व्या वर्षानंतर बद्धकोष्ठता ही एक मोठी समस्या बनते. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी काही सुवर्ण नियम आहेत; जसे की सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे, कोंडा असलेले पीठ खाणे, झोपेची वेळ निश्चित करणे व त्रिफळा पावडर यांचे सेवन करणे.
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांच्या मते, बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी तुम्ही देशी आणि प्रभावी पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. काही फळे अशी आहेत की, जी बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहेत आणि त्यांचे सेवन केल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासूनही मुक्ती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणती फळे बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत.
पपई : पचनशक्तीसाठी उत्तम
पपई हे पचनसंस्थेसाठी सर्वांत विश्वासार्ह फळांपैकी एक मानले जाते. पपईतील पपेन एंझाइम प्रथिने तोडण्यास मदत करते आणि जलद पचन सुलभ करते. त्यात विरघळणारे फायबरदेखील असते,ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि आतड्यांना स्वच्छ करण्यास मदत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिकलेली पपई खाल्ल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता हळूहळू कमी होते.
आलूबुखारा : आतड्यांच्या सुलभ स्वच्छतेची क्षमता
बद्धकोष्ठतेसाठी आलूबुखारा हे फळ सर्वांत प्रभावी नैसर्गिक उपायांपैकी एक मानले जाते. त्यात सॉर्बिटॉल असते, जे नैसर्गिक रेचक म्हणून काम करीत मल मऊ करते. त्यामध्ये फायबर आणि पॉलीफेनॉल हे घटकदेखील असतात, जे आतड्यांतील जीवाणूंना सक्रिय ठेवतात. ३-५ आलूबुखारा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने आतडी सहज साफ होतात.
किवी : पोटाच्या समस्या दूर करण्यास साह्यभूत
किवी हे एक लहान फळ आहे; परंतु ते पचनासाठी अविश्वसनीय शक्तिशाली असे आहे. ऑक्टेनिडाइन हे एंझाइम प्रथिनांचे पचन सुधारते आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. किवीमध्ये विरघळणारे फायबरदेखील भरपूर प्रमाणात असते, जे मल मऊ करते आणि पोटावरील दबाव कमी करते. दररोज एक ते दोन किवी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि जडपणा कमी होण्यास मदत होते.
अंजीर : जुनाट बद्धकोष्ठतामुक्तीची किमया
अंजीर हे बद्धकोष्ठतेसाठी आयुर्वेदिक रामबाण औषध मानले जाते. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही प्रकारचे फायबर असते, जे आतड्यांना उत्तेजित करते. वाळलेल्या अंजीरामध्ये नैसर्गिक साखर आणि म्युसिलेज असते, जे आतड्यांच्या हालचाली सुलभ करते. २-४ अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्याने जुनाट बद्धकोष्ठतादेखील हळूहळू सुधारू शकते.
नाशपाती : सालींसह खाण्याने पचनसंस्थेच्या कार्यात सुधारणा
नाशपाती हे उच्च फायबर असलेले फळ आहे, जे पचनसंस्था सुस्थितीत राखण्यास मदत करते. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील असे दोन्ही प्रकारचे फायबर असते, जे आतड्यांची हालचाल सुधारते. नाशपातीमध्ये फ्रुक्टोज आणि पाणी असल्यामुळे मल मऊ होतो. ते नेहमी सालीसह खावे, कारण- बहुतेक फायबर सालींमध्ये आढळते.
