Colon cancer early symptoms: तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्हाला दररोज सकाळी जाणवणारा जडपणा किंवा बद्धकोष्ठता ही केवळ गॅसची समस्या नसून, एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते? अलीकडेच एका २९ वर्षीय तरुणाला वरवर साध्या वाटणाऱ्या बद्धकोष्ठतेचे निदान झाले, ज्याचे पुढे मोठ्या आतड्याच्या कर्करोगात (कोलन कॅन्सर) रूपांतर झाले. आरोग्य तज्ज्ञ आता असा इशारा देत आहेत की, तरुण लोकांमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

२९ वर्षीय विंटनर-जॅक्सनची जीवनशैली खूप सक्रिय होती. त्याला मॅरेथॉन धावायला आवडत असे. मार्च २०२० मध्ये त्याला त्याच्या डाव्या नितंबाच्या खालच्या भागात थोडी वेदना जाणवली. पुढील चार महिने त्याला त्या भागात अधूनमधून वेदना होत राहिली. जॅक्सनने ‘बिझनेस इनसायडर’ला सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस सकस आहार घेऊनही त्याला तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागला. त्या तरुणाला आठ दिवस शौचास न झाल्याने जून २०२० मध्ये तो एका तातडीच्या उपचार केंद्रात गेला, जिथे एक्स-रेमध्ये त्याच्या मोठ्या आतड्यात काहीतरी साचल्याचे दिसून आले. डॉक्टरांना वाटले की, तो मल आहे आणि त्यांनी त्याला रेचक औषधे देऊन काळजी करण्यासारखे काही नाही, असे सांगितले.

विंटनर-जॅक्सन म्हणाले की, त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे काही दिवस आराम मिळाला; पण बद्धकोष्ठतेचा त्रास लवकरच परत झाला. जॅक्सन म्हणाले की, त्यांना पोट फुगल्यासारखा त्रास होऊ लागला. ते जूनच्या मध्यात पुन्हा तातडीच्या उपचार केंद्रात गेले आणि त्यांना रेचक औषधे देण्यात आली; पण बद्धकोष्ठता कायम राहिली आणि त्यांच्या पोटातील वेदना वाढल्या. या पचनाच्या समस्यांमुळे त्यांना जुलैच्या सुरुवातीला तिसऱ्यांदा तातडीच्या उपचार केंद्रात जावे लागले. त्यांना पुन्हा औषध देण्यात आले आणि लक्षणे तशीच राहिल्यास दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले. जॅक्सन म्हणाले की, त्यांची अवस्था अशी होती की, जणू काही त्यांचे पोट फुटेल. या त्रासामुळे त्यांना झोप लागत नव्हती.

सीटी स्कॅनमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे निदान

जॅक्सनची अवस्था पाहून, डॉक्टरांनी त्याला ताबडतोब सीटी स्कॅनसाठी पाठवले. त्यातून त्याच्या मोठ्या आतड्यात (कोलनमध्ये) एक गाठ असल्याचे उघड झाले, ज्यामुळे अन्नमार्गात अडथळा निर्माण झाला होता. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब आपत्कालीन विभागात पाठवले, जिथे कर्करोग तज्ज्ञांनी (ऑन्कोलॉजिस्टने) त्याला सांगितले की, गाठ काढण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल. शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या मोठ्या आतड्यातून गोल्फ बॉलच्या आकाराची गाठ, तसेच मोठ्या आतड्याचा १५ इंच भाग आणि १५ लसिका ग्रंथी (लिम्फ नोड्स) काढण्यात आल्या, ज्यापैकी सात ग्रंथींमध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला होता. डॉक्टरांनी पुष्टी केली की, त्याला तिसऱ्या टप्प्यातील (स्टेज ३) मोठ्या आतड्याचा कर्करोग (कोलन कॅन्सर) झाला आहे.

कमी वयोगटात कोलन कॅन्सरग्रस्तांची वाढ

१९९० च्या दशकापासून ५० वर्षांखालील लोकांमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे (कोलन कॅन्सरचे) प्रमाण वाढत आहे. मोठ्या आतड्याचा कर्करोग हा तरुण लोकांमध्ये सर्वांत प्राणघातक कर्करोग बनला आहे. अंदाजे ७५% तरुण रुग्णांमध्ये या रोगाचे निदान प्रगत अवस्थेत होते. अमेरिकेतील २०२५ च्या एका सर्वेक्षणानुसार, ४५ वर्षांखालील ४५% रुग्णांनी सांगितले की, त्यांच्या पोटाच्या किंवा आतड्यांच्या लक्षणांकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले होते. तथापि, मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागे अनेक घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते, ज्यात बालपणी अँटीबायोटिक्सचा वाढता वापर, मायक्रोप्लास्टिक्स, कीटकनाशके आणि उच्च साखर व कमी फायबर असलेला आहार यांचा समावेश आहे. या आहारामुळे आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या रचनेत (गट मायक्रोबायोममध्ये) बदल होऊ शकतात.

लहान वयात दिसणारी मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे

तरुण वयात मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या सामान्य लक्षणांमध्ये शौचातून रक्त पडणे, पोटदुखी, वजन कमी होणे, भूक न लागणे व बद्धकोष्ठता यांचा समावेश होतो. तरुणांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि त्याबाबत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असा आग्रह संशोधकांकडून केला जात आहे.

मोठ्या आतड्यापासून फुप्फुसांपर्यंत कर्करोग कसा पसरतो

विंटर-जॅक्सनने केमोथेरपी सुरू केली,जी दर दोन आठवड्यांनी याप्रमाणे सहा महिन्यांपर्यंत घ्यावी लागली. केमोथेरपीच्या १२ फेऱ्यांनंतर, अहवालात कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत; परंतु नऊ महिन्यांनंतर, रक्त तपासणीत ०.१% कर्करोगाच्या पेशी आढळल्या; परंतु डॉक्टर त्यांचे नेमके स्थान निश्चित करू शकले नाहीत. जवळपास वर्षभर चाचण्या केल्यानंतर असे आढळून आले की, कर्करोगाच्या पेशी मोठ्या आतड्यातून फुप्फुसांपर्यंत पसरल्या होत्या. ऑक्टोबर २०२२ मध्ये चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले.

दीर्घकालीन आजारासह जीवन

विंटनर-जॅक्सन यूकेला परतले आहेत, जिथे त्यांच्यावर सातत्याने केमोथेरपीचे उपचार सुरू आहेत, ज्यामुळे सध्या कर्करोगाची वाढ मंदावली आहे. ते म्हणाले की, आता तो पूर्णपणे नाहीसा करणे कठीण आहे. कारण- तो फुप्फुसांपर्यंत पसरला आहे; परंतु जर त्याची वाढ मंद आणि दीर्घकाळ टिकणारी असेल, तर त्यासोबत सामान्य जीवन जगणे शक्य आहे. जॅक्सन म्हणाले की, कधी कधी त्यांना बरे वाटते, तर कधी कधी लहानसहान गोष्टीही अवघड वाटतात. त्यामुळे ते आता पूर्णवेळ काम करू शकत नाहीत. त्यांनी आपली जीवनशैली बदलली आहे. ते म्हणाले की, आता ते बागकाम, आपल्या कुत्र्याला फिरायला नेणे आणि शांत जीवन जगण्यात आपला वेळ घालवतात.