Health benefits of 2 cloves: लवंग हा लवंगाच्या झाडाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्यांपासून बनवलेला एक सुगंधित आणि तिखट मसाला आहे. आयुर्वेदात लवंग हा एक औषधी मसाला मानला जातो, जो पचन, दातदुखी, खोकला व सर्दी आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित समस्यांमध्ये उपयुक्त आहे. लवंगेमध्ये असलेल्या पोषक तत्त्वांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, चरबी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम व मँगनीज असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
लवंगेमध्ये युजेनॉल नावाचे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंटदेखील असते, जो वेदनाशामक आणि दाहकविरोधी गुणधर्म मिळवून देतो. दररोज दोन लवंग खाल्ल्याने जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण होते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या दोन लवंगा खाल्ल्याने पचन सुधारते. तोंडाच्या आणि दंत आरोग्यासाठी दोन लवंगा चावणे फायदेशीर आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. विनोद शर्मा यांच्या मते, दररोज दोनपेक्षा जास्त लवंगा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचू शकते. तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, सामान्यतः दिवसातून एक किंवा दोनपेक्षा जास्त लवंगांचे सेवन करू नये. जास्त लवंगा खाल्ल्याने या सहा आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
रक्त पातळ होऊ शकते.
लवंगेमध्ये रक्त पातळ करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात, जे रक्त पातळ करण्याचे काम करतात. जरी हा गुणधर्म कमी प्रमाणात असला तरी तो फायदेशीर ठरू शकतो; परंतु जास्त लवंगा खाल्ल्याने एखादी जखम झाल्यावर वा इतर कोणत्याही कारणाने अतिरिक्त रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. लवंगेचे जास्त प्रमाणात सेवन करणे विशेषतः अॅस्पिरिन, वॉरफेरिन किंवा इतर रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत किरकोळ दुखापतींमुळेदेखील जास्त रक्तस्राव होऊ शकतो.
यकृताला नुकसान होऊ शकते
लवंगेमध्ये युजेनॉल नावाचा एक पदार्थ असतो, जो अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतो. मात्र, जास्त प्रमाणात लवंगांचे सेवन यकृतासाठी हानिकारक असू शकते. दीर्घकाळापर्यंत लवंगांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने यकृतावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे यकृताचे नुकसान किंवा विषाक्त घटक शरीरात वाढण्याचा धोका वाढतो. ज्यांना आधीच यकृताचे आजार आहेत, त्यांनी लवंगांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
पचनसंस्था बिघडू शकते
लवंगा जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, गॅस, आम्लपित्त, उलट्या, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात. लवंगाचा तापमानवाढीचा प्रभाव असतो, ज्यामुळे त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाच्या आवरणाला नुकसान पोहोचू शकते. ही समस्या पचनक्रिया बिघडलेल्या लोकांमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लवंगांचे सेवन कमी प्रमाणात करणे चांगले.
गरोदरपणात हानिकारक
गरोदरपणात महिलांनी लवंगांचे जास्त सेवन करणे टाळावे. लवंगाचा तापमानवाढीचा प्रभाव असतो, ज्यामुळे गर्भधारणेतील गुंतागुंती वाढू शकतात. जास्त प्रमाणात लवंगांचे सेवन केल्याने पोटात जळजळ, पेटके किंवा हार्मोनल असंतुलन होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये यामुळे गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतदेखील होऊ शकते. म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लवंग किंवा लवंग-आधारित उत्पादने खावीत.
लवंग तेलामुळे तोंडात जळजळ होऊ शकते
लवंग तेल बहुतेकदा दातदुखीसाठी वापरले जाते; परंतु जास्त किंवा अयोग्य वापर हानिकारक असू शकतो. लवंग तेल जास्त प्रमाणात लावल्याने तोंडात जळजळ, फोड, सूज किंवा सुन्नपणा येऊ शकतो. काही लोकांमध्ये, ते हिरड्यांनादेखील नुकसान पोहोचवू शकते. म्हणून लवंग तेलाचा थेट वापर करण्याऐवजी मर्यादित प्रमाणात आणि सावधगिरीने करावा.
अॅलर्जीची समस्या उदभवू शकते
काही लोकांना लवंग किंवा लवंगांवर आधारित उत्पादनांची अॅलर्जी असू शकते. अशा व्यक्तींना लवंग खाल्ल्याने किंवा लावल्याने खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे, सूज येणे, तोंडात जळजळ होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या अॅलर्जी होऊ शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये ही अॅलर्जी धोकादायक ठरू शकते. लवंग खाल्ल्यानंतर तुम्हाला काही अस्वस्थता जाणवल्यास, ताबडतोब त्याचा वापर बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
