Health Benefits of Black Salt : कलिंगड, पेरू खाताना किंवा अगदी फ्रुट चाट किंवा सॅलड खाताना चिमूटभर काळ मीठ किंवा चाट मसाला टाकला तर चवच बदलून जाते. काळं मीठ, चाट मसाला आपण फार पूर्वीपासून गेवगेळ्या पदार्थांमध्ये वापरत चाललो आहोत. पण, चवीपलीकडे, यामागे आणखीही काही कारणे आहेत. सध्या सोशल मीडियामुळे काळ मीठ पुन्हा ट्रेंडमध्ये आलं आहे, विशेषतः “डिटॉक्स” साठी. पण काळं मीठ वापरणं फायदेशीर असलं तरीही त्याला मर्यादेतच वापरणं महत्त्वाचं आहे.
काळ मीठ फळांमध्ये का टाकतात?
काळे मीठ खनिजांनी समृद्ध असलेले सैंधव मीठ आहे, ज्यावर औषधी वनस्पती आणि कोळशाच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते. त्यामुळेच त्याला किंचित आंबट चव आणि गंधकासारखा तीव्र वास येतो. प्रत्येकालाच त्याचा वास आवडतो असे नाही, पण त्याची चव मात्र छान लागते. अनेकदा फळांमध्ये आणि ताक, लिंबूपाणी किंवा जलजीरा यांसारख्या पेयांमध्ये घातले जाते. यामागे एक व्यावहारिक कारण आहे. कापलेली फळे थोडा वेळ बाहेर ठेवल्यास ती तपकिरी होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हा केवळ चवीचा प्रश्न नाही, तर फळे ताजी ठेवण्याचाही हा एक भाग आहे.
संशोधन काय सांगते?
‘करंट रिसर्च इन कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, फळांवर काळे मीठ टाकल्याने शरीराला त्या फळांमधील पोषक घटक (न्यूट्रिएंट्स) अधिक चांगल्या प्रकारे शोषता येऊ शकतात. म्हणजेच, फळं खाल्ल्यावर त्याचा फायदा शरीराला जास्त मिळू शकतो. तसंच, काळं मीठ फळांमधील “ऑक्सिडेशन” (हवेच्या संपर्कात येऊन फळं काळी पडण्याची प्रक्रिया) कमी करण्यात मदत करतं. म्हणूनच फळांवर काळं मीठ घातल्यावर ती लगेच काळी पडत नाहीत.
आरोग्यदायी फायदे
- पित्ताचे (bile) उत्पादन उत्तेजित करून ते पचनास मदत करू शकते; यामुळे अन्नाचे विघटन होण्यास मदत मिळते.
- विशेषतः जड जेवणानंतर होणारा पोटफुगीचा आणि गॅसचा त्रास कमी करण्यास मदत होते.
- शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचा समतोल राखण्यास मदत होते. म्हणूनच उन्हाळ्यातील पेयांमध्ये याचा वापर सर्रास केला जातो.
- नेहमीच्या साध्या मिठाच्या तुलनेत काळ्या मिठामध्ये सोडिअमचे प्रमाण थोडे कमी असते. यामुळे, विशेषतः काळजीपूर्वक वापरल्यास, काळे मीठ तुलनेने अधिक चांगला पर्याय ठरतो.
दुष्परिणाम
या बाबतीत काही गोष्टींकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. काळे मीठ हे शेवटी मीठच आहे. आणि त्याचे अतिसेवन करणे योग्य नाही.जर काळ्या मिठाचे सेवन दिवसाला सुमारे ३ ग्रॅमपेक्षा जास्त झाले, तर पुडे समस्या उद्भवू शकतात…
- इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन, ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो आणि लघवीचे प्रमाण वाढू शकते.
- पोटात जळजळ किंवा पोट फुगी.
- सोडियमची पातळी वाढणे. विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी धोकादायक.
- अतिरिक्त फ्लोराइडमुळे फ्लोरोसिससारख्या दातांच्या समस्या.
- निरोगी प्रौढांसाठी दिवसाला सुमारे २ ते ३ ग्रॅम हे प्रमाण सुरक्षित आहे. तसेच, इतर जास्त सोडियम असलेल्या पदार्थांसोबत याचे सेवन केल्यास अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त सेवन होऊ शकते.
भारतात काळे मीठ का महत्त्वाचे आहे?
भारतासारख्या उष्ण देशात, फळे आहाराचा एक मोठा भाग आहेत. ती शरीराला हायड्रेट करतात, ऊर्जा देण्यास मदत करतात आणि काळे मीठ अनेकदा त्यात आपोआपच जोडले जातात. सोशल मीडियावरील ट्रेंडमुळे काळ्या मिठाला डिटॉक्सचा उपाय म्हणून प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे लोक त्याचा अतिवापर करतात. इथूनच समस्या सुरू होतात. ते टाळण्याचा प्रश्न नाही, तर ते हुशारीने वापरण्याचा प्रश्न आहे. एक किंवा दोन चिमूटभर मीठ टाकणे पुरेसे आहे. गरज असेल तेव्हाच वापरा, विशेषतः उन्हाळ्यात…
