Health benefits of dates: काही काळापासून सोशल मीडियावर खजूर खाणे हा एक लोकप्रिय ट्रेंड आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, दररोज दोन खजूर खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. काही लोक ‘सुपर हेल्थ स्नॅक’ म्हणून याचा प्रचार करत आहेत. काहींचा असा दावा आहे की, फक्त दोन खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित होते. तर, काहींचा असा दावा आहे की, त्यामुळे कोलेस्ट्रॉलदेखील कमी होते. आता, संपूर्ण सत्य आणि याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

तज्ज्ञ काय म्हणतात….?

खजूर आरोग्यासाठी चांगले आहेत यावर तज्ज्ञांचे एकमत आहे; पण ते जाद नाहीत. सर्व सुक्या मेव्यांप्रमाणे, त्यातही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.खजूरमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन, फोलेट व व्हिटॅमिन एसारखे अनेक पोषक घटक असतात. परंतु, हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की, त्यामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. सुमारे चार मोठ्या खजुरांमध्ये सुमारे २७७ कॅलरीज आणि ६६ ग्रॅम साखर असते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या ज्युलिया झुम्पानो म्हणतात, “खजूर खाण्यास चांगले आहेत; परंतु त्यांचे प्रमाण नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन मोठे किंवा तीन लहान खजूर खाणे ही एक सुरक्षित मर्यादा आहे. त्यामुळे तुम्हाला पोषक तत्त्वे मिळतील; परंतु जास्त साखर मिळणार नाही.”

कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो?

खजूर कोलेस्ट्रॉल कमी करतात की नाही यावर अजूनही एकमत नाही. तथापि, काही संशोधने असे सूचित करतात की, ते एकूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये किंचित सुधारणा करू शकतात. पण, तज्ज्ञ कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खजूर खाण्याची शिफारस करत नाहीत. व्हेरी वेल हेल्थ म्हणते की, खजूरमध्ये सुक्रोज, ग्लुकोज व फ्रुक्टोजसारखी नैसर्गिक साखर असते. मात्र, झुम्पानो स्पष्ट करतात की, खजूरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे साखरेचे शोषण मंदावते. म्हणूनच ते कोल्ड्रिंक्स किंवा प्रक्रिया केलेल्या मिठायांच्या तुलनेत रक्तातील साखर हळूहळू वाढवते, ज्यामुळे मधुमेहींसाठीदेखील तो एक चांगला पर्याय बनतो.

जर तुम्ही दररोज २ खजूर खाल्ल्यास काय होईल?

खजुरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनास मदत करते आणि आतड्यांच्या हालचालींना चालना देते. त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम व लोह यांसारखी महत्त्वाची खनिजे असतात, जी हृदय, स्नायू व हाडांच्या आरोग्यास मदत करतात.
खजुरामधील बी६ सारखी जीवनसत्त्वे चयापचय आणि मेंदूच्या कार्याला आधार देतात.
खजुरामधील नैसर्गिक साखरेमुळे ते दिवसभर हळूहळू ऊर्जा सोडतात.
खजुरामधील अँटीऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
त्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
त्यामधील कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते.