Benefits Of Garlic: कच्चा लसूण केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी गुणधर्मांमुळे लसूण एक सुपरफूड मानला जातो. लसूण रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि एकूण आरोग्य राखण्यास मदत करतो. अनेक वर्षांपासून भारतीय घरांमध्ये औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे नेमके काय फायदे आणि नुकसान होते याबाबत जाणून घेऊ…

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे नैसर्गिक संयुग असते. ते शरीराला बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते. २०१५च्या एका अभ्यासानुसार, अ‍ॅलिसिन हे संयुग रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्ची लसूण खाल्ल्याने सर्दी आणि वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

उच्च रक्तदाब हा एक सायलेंट किलर आहे. कच्च्या लसणाच्या काही पाकळ्या त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. अनेक अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की, लसूण वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब संतुलित करण्यास मदत करू शकते. २०२०च्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की, लसूण हृदयरोग कमी करण्यास मदत करू शकते. वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) राखते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

पचन चांगले होते

लसूण चांगले बॅक्टेरिया वाढवून आणि पचन सुधारून आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने गॅस, पोटफुगी आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात.

लसणाचे दुष्परिणाम

कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र काही लोकांना पित्त, छातीत जळजळ, तोंडाची दुर्गंधी किंवा घामाचा तीव्र वास सारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून पोटाच्या समस्या असलेल्यांनी रिकाम्या पोटी न घेता नाश्त्यानंतर एका लसणेच्या पाकळीने सुरूवात करावी. जर तुम्हाला कच्च्या लसणाची चव आवडत नसेल तर तुम्ही तो मधात मिसळू शकता.