What reduces diabetes quickly naturally : घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावली जाणारी तुळस ही केवळ धार्मिकदृष्ट्या पवित्र मानली जात नाही, तर आयुर्वेदात तिला एक महत्त्वाची औषधी वनस्पती म्हणूनही स्थान आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातही तुळशीच्या गुणधर्मांवर अनेक संशोधन झाले असून, बदलत्या ऋतूंमध्ये होणारी सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या तक्रारी कमी करण्यास ती उपयुक्त ठरते. तसेच काही अभ्यासांनुसार तुळशीची पाने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात, त्यामुळे मधुमेह व्यवस्थापनातही तिचा उपयोग होऊ शकतो असे मानले जाते.

‘जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजी अँड फायटोमेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या क्लिनिकल संशोधनानुसार, जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला ओळखणे थांबवतात, तेव्हा टाईप २ मधुमेह होतो. तेव्हा तुळशीच्या पानांचा अर्क स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना थेट उत्तेजित करतो. यामुळे इन्सुलिनचा स्राव वाढतो आणि पेशींमधील इन्सुलिन रिसेप्टर्सची संवेदनशीलता सक्रिय होते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे सहजपणे ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकते.

आयुर्वेदिक आणि युनानी औषधशास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर त्यांनी तुळशीची पाने खावीत. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटी-इन्फ्लूएंझा आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला आजारांपासून वाचवतात आणि चांगले आरोग्य राखतात. तुळशीची पाने मधुमेहावर कशाप्रकारे नियंत्रणात ठेवतात जाणून घेऊयात…

उपाशीपोटी आणि जेवणानंतर खा

‘इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री’मध्ये प्रकाशित झालेल्या, टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांवरील एका चाचणीमध्ये, रुग्णांना एका विशिष्ट कालावधीसाठी दररोज सकाळी उपाशीपोटी तुळशीच्या पानांची पावडर देण्यात आली. ज्यांनी दररोज तुळशीच्या पावडरचे सेवन केले, त्यांच्या उपाशीपोटीच्या रक्तातील साखरेमध्ये (उपाशीपोटी) १७.६ टक्के आणि जेवणानंतरच्या साखरेमध्ये (म्हणजेच, जेवणानंतरची साखर) ७.३ टक्के घट झाल्याचे दिसून आले. तुळस जेवणानंतर कर्बोदकांच्या विघटनाची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.

अँटीऑक्सिडंट्स

‘जर्नल ऑफ क्लिनिकल अँड बायोकेमिकल न्यूट्रिशन’नुसार, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात, ज्यामुळे डोळ्यांचे (रेटिनोपॅथी) आणि मूत्रपिंडांचे (नेफ्रोपॅथी) नुकसान होऊ शकते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, तुळशीमधील मुबलक अँटीऑक्सिडंट्स या फ्री रॅडिकल्सना नष्ट करतात. यामुळे भविष्यात मधुमेहामुळे होणाऱ्या मूत्रपिंड, डोळे, मज्जातंतू आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.

रोगप्रतिकारशक्ती

तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, युजेनॉल आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे बदलत्या हवामानात होणारी सर्दी, खोकला आणि मोसमी संसर्गांपासून संरक्षण मिळण्यास तिचा उपयोग होतो.

ताण

तुळशीला अ‍ॅडाप्टोजेन मानले जाते. याचा अर्थ असा की, ती शरीराला मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकते. काही संशोधनात असेही आढळून आले आहे की, तुळस तणाव संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. ‘एव्हिडन्स-बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन’मधील एका न्यूरोलॉजिकल अहवालानुसार, जेव्हा आपण मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा शरीरातील अधिवृक्क ग्रंथी (adrenal glands) “कॉर्टिसोल” नावाचे तणाव संप्रेरक (stress hormone) तयार करतात. हा कॉर्टिसोल शरीराला तणावाशी सामना करण्यासाठी ऊर्जा उपलब्ध करून देतो. यासाठी तो यकृतावर (liver) परिणाम करतो आणि साठवलेला ग्लुकोज रक्तात सोडण्यास सांगतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी तात्पुरती वाढते आणि शरीराला पटकन ऊर्जा मिळते. तुळस वैज्ञानिकदृष्ट्या एक उत्कृष्ट अ‍ॅडाप्टोजेन म्हणून ओळखली जाते. तुळशीचे सेवन केल्याने मेंदू शांत होतो आणि कॉर्टिसोलची पातळी ३० टक्यांपर्यंत कमी होते, ज्यामुळे तणावामुळे होणारी साखरेची वाढ नियंत्रित होते.

पचनसंस्था

तुळशीमुळे पाचक एन्झाइम्सचा स्राव वाढतो, ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात. तिचे सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशन’नुसार, तुळस जठररस आणि पाचक एन्झाइम्सच्या स्रावात संतुलन राखते. ती यकृत आणि आतड्यांची चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे अन्नाचे योग्य शोषण होते. निरोगी पचनसंस्था राखल्याने ग्लुकोजची पातळी आणि वजन दोन्ही नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्य

तुळशीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला संभाव्य फायदा होऊ शकतो. पण, यासाठी अधिक वैज्ञानिक संशोधनाची आवश्यकता असते.

तुळशीचे सेवन करताना पुढील गोष्टी ठेवा लक्षात

जरी तुळस सामान्यतः सुरक्षित मानली जात असली तरीही जर तुम्ही मधुमेहाची औषधे, रक्त पातळ करणारी औषधे किंवा इतर गंभीर वैद्यकीय आजारांवरील औषधे घेत असाल, तर नियमितपणे मोठ्या प्रमाणात तुळशीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी देखील वैद्यकीय सल्ल्याशिवाय हर्बल उपायाचे नियमित सेवन करणे टाळावे. मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपली औषधे बंद करू नयेत आणि केवळ पूरक उपाय म्हणून तुळशीचा वापर करावा.