Best juice to clean colon: आतडे हा आपल्या पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते लहान आणि मोठे अशा दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे. लहान आतडे अन्न पचवणे आणि पोषक तत्त्वे शोषणे ही कार्ये करते; तर मोठे आतडे पाणी व इलेक्ट्रोलाइट्स शोषून घेते आणि विष्ठादेखील साठवते. आतड्यांचे आरोग्य थेट आपल्या पोषण, ऊर्जेची पातळी आणि एकूण आरोग्याशी जोडलेले असते. जेव्हा आतडी योग्यरीत्या कार्य करतात तेव्हा पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे सहजपणे मिळतात. या महत्त्वाच्या अवयवाची नियमित काळजी आणि स्वच्छता आवश्यक मानली जाते. आतड्यांना डिटॉक्सिफाइड ठेवल्याने केवळ पचनक्रियाच योग्य राखली जाते, असे नाही; तर रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते, वजन संतुलित होते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक व टीव्ही व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, तुमच्या आहारात काही नैसर्गिक रसांचा समावेश करणे आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञ स्पष्ट करतात की, योग्य रसांचे नियमित सेवन केल्याने आतड्यांमधील कचरा बाहेर पडतो, विषाक्त घटक बाहेर पडतात आणि आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते, जे पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात. चला तर मग, बीटरूट आणि आल्याचा रस पचन कसे सुधारतो आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया कसे वाढवतो ते आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

बीट, आले, हळद व काळी मिरी यांचा रस आतड्यांसाठी कसा आरोग्यदायी?

डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, बीट आणि आल्याचा रस आतड्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. या रसातील नैसर्गिक पोषक तत्त्वे पचनक्रिया जलद करतात आणि आतड्यांना चांगले कार्य करण्यास मदत करतात. या रसात जोडले गेलेले इतर नैसर्गिक घटक आतडे मजबूत करतात आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त मानले जातात. बीटचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या देखील कमी होऊ शकतात.

बीटरूट आतड्यांसाठी कसे फायदेशीर?

बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यात असलेले आहारातील फायबर आतडे स्वच्छ करण्यास मदत करते आणि आतड्यांची हालचाल सुलभ करते. बीटरूट प्री-बायोटिक म्हणून काम करते, आतड्यांमधील चांगले जीवाणू वाढवते. त्याशिवाय बीटरूट यकृत आणि आतड्यांमधून विषाक्त घटक काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे योग्य पचनक्रिया राखली जाते. बीटरूटमध्ये इन्युलिन नावाचे एक विशेष प्रकारचे फायबर असते.

न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, बीटरूट फायबर प्री-बायोटिक म्हणून काम करते. ते आपल्या आतड्यांमधील ‘चांगले जीवाणू’ (प्रोबायोटिक्स) पोसते. ते खाल्ल्याने बायफिडोबॅक्टेरियाची संख्या वेगाने वाढते, जे पचन सुधारते आणि आतड्यांमधील जळजळ कमी करते.

आले आतड्यांचे आरोग्य कसे सुधारते?

आले हा एक प्रभावी नैसर्गिक घटक आहे, जो पचनसंस्थेला सक्रिय करतो. त्यातील जिंजरॉल आणि शोगाओल यांसारखी संयुगे गॅस, अपचन व पोटफुगी कमी करण्यास मदत करतात. आले आतड्यांतील स्नायूंना आराम देते, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते. ते पोटफुगी व पेटके येण्याची समस्या कमी करते आणि आतड्यांतील हालचाली संतुलित ठेवते. युरोपियन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आले पोटातून लहान आतड्यात अन्न पाठविण्याची प्रक्रिया २५-५०% ने वेगवान करते. जेव्हा अन्न बराच काळ पोटात कुजत नाही, तेव्हा गॅस, आम्लता आणि जडपणाची समस्या राहत नाही. अपचनासाठी हे जगातील सर्वांत प्रभावी नैसर्गिक औषध मानले जाते.

आतड्यांसाठी हळद का महत्त्वाची?

हळदीतील करक्यूमिन हे एक शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट आहे. ते आतड्यांतील जळजळ कमी करते आणि आतड्यांचे निरोगी आवरण राखण्यास मदत करते. हळदीमुळे पाचक एंझाइमचा स्राव वाढतो, ज्यामुळे अन्नाचे चांगले विघटन होण्यास मदत होते. हळदीच्या नियमित सेवनाने आतड्यात जळजळ, गॅस व आम्लता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

काळी मिरी आतड्यांच्या आरोग्यासाठी कशी साह्यभूत?

काळ्या मिरीमधील पाइपरिन पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ते पोषक तत्त्वांचे शोषण सुधारते आणि हळदीसारख्या घटकांची प्रभावीता वाढवते. काळी मिरी वायू व जडपणा कमी करते आणि आतड्यांमधून टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे चयापचय सक्रिय होऊन आतड्यांचे आरोग्य मजबूत होते .

आतड्यांसाठी हा रस कसा बनवायचा?

साहित्य

  • बीट – १ मध्यम आकाराचे
  • आले – १ इंचाचा तुकडा
  • लिंबाचा रस – दोन चमचे लिंबाचा रस
  • हळद पावडर – अर्धा चमचा हळद पावडर
  • काळी मिरी – चवीनुसार

कृती

प्रथम बीट पूर्णपणे धुऊन घ्या. नंतर त्याचे लहान लहान तुकडे करून ब्लेंडरमध्ये टाका. त्यात आले, हळद व काळी मिरी टाकून व्यवस्थित एकमेकांत मिसळा. मग ब्लेंडर चालू करा. आता तुमच्या आतड्यांसाठी अनुकूल असा रस तयार आहे. तो एका ग्लासमध्ये गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस घाला आणि ताजा असतानाच प्या.