Hip Joint Tumor Symptoms : कंबरेचे दुखणे हे बऱ्याचदा थकवा किंवा संधिवात म्हणून नाकारले जाते; परंतु कधी कधी ते अधिक गंभीर स्थितीचे प्रारंभिक लक्षण असू शकते- जसे की, कंबरेचा सांध्याचा ट्यूमर. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कंबरेत सांध्यांमध्ये ट्यूमरचा त्रास असल्यास हाडांमध्ये पेशींची असामान्य वाढ झालेली असते, जी सौम्य आणि घातक अशा दोन्ही प्रकारची असू शकते. आपल्या शरीराचे वजन आणि गतिशीलता टिकवून ठेवण्यात हा भाग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, त्यामध्ये असलेल्या कोणत्याही गाठी किंवा सूज लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हाडे आणि सांध्यांचे तज्ज्ञ असलेले ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दुष्यंत यांच्या मते, हा एक असा ट्यूमर आहे, जो हाडांमध्ये वेगाने पसरतो. तो विशेषतः कंबरेच्या सांध्यांवर परिणाम करू शकतो.

डॉक्टरांच्या मते, हिप ट्यूमर कधी कधी मेटास्टॅटिक असू शकतात. याचा अर्थ असा की, कर्करोग शरीराच्या दुसऱ्या भागात, जसे की स्तन, फुप्फ्फुस किंवा पुरुषस्थ ग्रंथी (प्रोस्टेट)मध्ये सुरू होतो आणि रक्तप्रवाहाद्वारे कंबरेच्या बाजुच्या हाडात पसरतो. म्हणून लवकर निदान आणि उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिप जॉइंट ट्यूमर म्हणजे काय, तो का होतो आणि त्याबाबतची कधीही दुर्लक्ष करू नये अशी लक्षणे जाणून घेऊयात.

कंबरदुखी म्हणजे काय?

कधी कधी कंबर किंवा मांडीमध्ये सतत होणारी वेदना ही साध्या स्नायूंच्या दुखण्यापेक्षा गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. काही प्रकरणांमध्ये ही वेदना कंबरेच्या सांध्यातील ट्यूमरची सुरुवातीचा सावधगिरीचा इशारादेखील असू शकतो. कंबरेच्या हाडात किंवा त्याच्या सभोवतालच्या ऊतींमध्ये असामान्य पेशी वाढू लागल्यावर कंबरेच्या सांध्यांतील ट्यूमर विकसित होतो. हाडांच्या कर्करोगांमध्ये, ऑस्टिओसारकोमा आणि कोंड्रोसारकोमा बहुतेकदा कंबरेच्या क्षेत्रावर परिणाम करतात. हे ट्यूमर दोन प्रकारचे असू शकतात, कर्करोग नसलेले (सौम्य) आणि कर्करोग असलेले (घातक). प्रत्येक ट्यूमर कर्करोगाचा नसतो; परंतु दीर्घकाळ टिकणाऱ्या कोणत्याही गाठीकडे किंवा वेदनेकडे दुर्लक्ष करू नये.

हिप जॉइंट ट्यूमरची कारणे

हिप जॉइंटमध्ये ट्यूमर किंवा तीव्र वेदना विविध कारणांमुळे होऊ शकतात, ज्यामध्ये आनुवंशिक बदल, हाडांचे जुनाट आजार, रेडिएशन एक्स्पोजर व कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये नेमके कारण अज्ञात राहते. हाडांचा कमकुवतपणा किंवा ऊतींमधील पेशींची असामान्य वाढदेखील या समस्येस कारणीभूत ठरू शकते.

कंबरदुखीची प्रमुख लक्षणे

कंबरेतील सांध्यांच्या समस्येचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे कंबर किंवा मांड्यांत सतत होणारी वेदना, जी विश्रांतीनंतरही कमी होत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये रात्रीच्या वेळी ही वेदना वाढते आणि चालण्यास त्रास होऊ शकतो. कंबरेभोवती सूज किंवा गाठ येणे हेदेखील एक गंभीर लक्षण असू शकते. अचानक वजन कमी होणे, थकवा येणे आणि हळूहळू वाढणारी वेदना हीदेखील या समस्येची लक्षणे असू शकतात.

कंबरेच्या सांध्यांतील ट्यूमरचे निदान कसे केले जाते?

हिप जॉइंटच्या गंभीर समस्येचे निदान करण्यासाठी, डॉक्टर अनेक चाचण्यांची शिफारस करू शकतात. त्यामध्ये एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन, हाडांचे स्कॅन व बायोप्सी यांचा समावेश असू शकतो. या चाचण्या ट्यूमरचे स्थान आणि तीव्रता अचूकपणे मूल्यांकन करण्यास मदत करू शकतात.

हिप जॉइंट ट्यूमरचे उपचार

हे उपचार ट्यूमरचा प्रकार आणि स्थानावर अवलंबून असतात. ट्यूमर काढून टाकण्यासाठी सहसा शस्त्रक्रिया केली जाते. जर ट्यूमर कर्करोगाचा असेल, तर रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचाही वापर केला जाऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतर शरीराची सामान्य हालचाल पुनर्संचयित करण्यासाठी शारीरिक उपचार आवश्यक असतात.

पुनर्प्राप्तीसाठी किती वेळ लागतो?

जर ट्यूमर कर्करोगरहित असेल, तर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य वाटण्यासाठी अंदाजे तीन ते सहा महिने लागू शकतात. जर ट्यूमर कर्करोगाचा असेल, तर बरे होण्यासाठी चार ते आठ महिने किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. बरे होण्याचा कालावधी रुग्णाची स्थिती आणि उपचार यांवर अवलंबून असतो.

डॉक्टरांना कधी भेटायचे?

जर कंबर किंवा मांड्यांमध्ये वेदना दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्या, रात्रीच्या वेळी त्या वाढल्या, सूज आली किंवा गाठ दिसली आणि चालणे कठीण झाले, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतो.