Early signs of liver damage: यकृत हा एक असा अवयव आहे, जो २४ तास अथकपणे काम करतो. रक्त शुद्धीकरण, विषारी पदार्थ काढून टाकणे, अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणे आणि संपूर्ण शरीरात ती ऊर्जा वितरित करणे या कार्यांमध्ये यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, खराब आहार, वजन वाढणे व अस्वास्थ्यकर जीवनशैली यांमुळे यकृतावर सातत्याने दबाव येतो. दीर्घकाळ यकृताकडे दुर्लक्ष केल्याने जळजळ, फॅटी लिव्हर आणि इतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे शरीर लवकर कमकुवत होऊन, अकाली वृद्धत्व येते.
वरिष्ठ यकृतरोग तज्ज्ञ व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शिवकुमार सरीन यांच्या मते, पित्त उत्पादन सुधारणारे आणि ते पातळ ठेवणारे पदार्थ यकृतासाठी सर्वांत योग्य आहेत. त्यासाठी नैसर्गिक आणि ताजे अन्न आवश्यक आहे. एकाच वेळी जास्त जेवण घेण्यापेक्षा दिवसभर थोडे थोडे जेवण खाल्ल्याने यकृतावरील भार कमी होतो. केवळ घन पदार्थच नाही, तर पाणी, सूप व पातळ डाळीसारखे पुरेसे द्रवपदार्थदेखील आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
यकृताचे आरोग्य राखण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तळलेले, जास्त गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यकृताचे नुकसान करू शकतात; तर हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि पुरेशा प्रमाणातील प्रथिने यकृताला मजबुती प्रदान करतात. योग्य आहार, सक्रिय जीवनशैली व नियमित आरोग्य तपासणी यकृताला दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
यकृताच्या नुकसानीची लक्षणे
- सकाळी उठल्यावर खूप थकवा जाणवणे.
- डोळे आणि नखे किंचित पिवळी होणे.
- पोटाच्या वरच्या उजव्या भागात जडपणा किंवा वेदना.
- अचानक भूक न लागणे.
- पाय आणि घोट्यांना सूज येणे.
- त्वचेवर काळे, लाल डाग.
- अस्पष्ट वजन वाढणे किंवा पोटाच्या घेरात वाढ होणे.
- तळवे लालसर होणे.
- गॅस आणि अॅसिडिटीच्या वारंवार समस्या
- लघवीचा रंग गडद होणे.
सुस्थितीतील यकृतासाठी ६०% कच्च्या अन्नाचा फॉर्म्युला वापरून पाहा
तुमचे यकृत सुस्थितीत ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमच्या अन्नाचा ६० टक्के भाग कच्च्या स्वरूपात खाणे. जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार, गाजर, मुळा, बीट व काकडी यांसारख्या कच्च्या भाज्यांमध्ये जिवंत एंझाइम आणि ग्लुकोसिनोलेट्स असतात. जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा त्यातील अनेक नैसर्गिक एंझाइम्स नष्ट होतात. कच्च्या भाज्या खाल्ल्याने यकृताला पचवण्यासाठी करावे लागणारे काम कमी होते, ज्यामुळे त्याचे डिटॉक्सिफिकेशन सोपे होते.
संपूर्ण धान्य यकृत फायबर शील्ड
तुमच्या आहारात तांदूळ आणि रिफाइंड मैद्याऐवजी ओट्स, ब्राऊन राईस व बार्ली यांचा समावेश करा. हार्वर्ड हेल्थच्या मते, संपूर्ण धान्यांमधील बी जीवनसत्त्वे आणि फायबर यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून रोखतात. ते रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात. जेव्हा साखरेची पातळी वाढत नाही, तेव्हा यकृताला जास्त इन्सुलिन प्रक्रिया करावी लागत नाही, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD) चा धोका कमी होतो
नट्स आणि सीड्स लिव्हर इमर्जन्सी रिपेअर किट
बदाम, अक्रोड आणि चिया सिड्स हे यकृतासाठी सुपरफूड आहेत. वर्ल्ड जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, नट्समध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ई यकृताच्या पेशींमधील जळजळ कमी करते आणि यकृताला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते. विशेषतः अक्रोड यकृताला अमोनियासारख्या विषारी घटकांपासून मुक्त करण्यास मदत करतात.
कृत्रिम गोड पदार्थांचे सेवन यकृताला हानी पोहोचवू शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, साखरमुक्त गोळ्यांमधील एस्पार्टम यकृतावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्याऐवजी मर्यादित प्रमाणात गूळ खाणे चांगले. जास्त तेल आणि ट्रान्स-फॅट्स यकृताच्या पेशींमध्ये उत्परिवर्तन करू शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अधूनमधून काहीतरी खाल्ल्याने यकृत विश्रांती घेण्यास प्रतिबंधित करते. जेवणांमध्ये किमान ४-५ तासांचे अंतर राखले, तर यकृताला स्वतःला स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळतो.
निष्कर्ष
‘हे’ पदार्थ यकृताचे शत्रू
यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अथकपणे काम करतो; परंतु जेव्हा त्याची क्षमता कमी होऊ लागते तेव्हा शरीर हळूहळू एक धोक्याचा इशारा देऊ लागते. संतुलित आणि नैसर्गिक आहार, वजन नियंत्रण, पुरेसे पाणी सेवन, नियमित शारीरिक हालचाली व नियमित तपासणी या बाबी यकृताला दीर्घकाळ सुस्थितीत आणि तरुण ठेवण्यास मदत करू शकतात. यकृताची काळजी ही एकूण आरोग्यासाठी गुंतवणूक आहे आणि ते जितक्या लवकर ओळखले जाईल तितके चांगले.

