नवी दिल्ली : केरळमध्ये सध्या ‘टोमॅटो फ्लू’चे ८० रुग्ण सापडले. ही सर्व पाच वर्षांखालील बालके आहेत. पुरळ किंवा फोड, त्वचेस खाज सुटणे आणि निर्जलीकरण, ही या तापाची प्रमुख लक्षणे आहेत. लहान मुलांत प्रामुख्याने याचा प्रादुर्भाव दिसत आहे. तामिळनाडूतही या तापाचे काही रुग्ण आढळले आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतांनुसार ‘टोमॅटो फ्लू’ हा अद्याप एक अज्ञात रोग आहे. त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याचा प्रादुर्भाव सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी दिसत आहे. या तापात अंगावर लाल रंगाचे फोड येतात. त्यामुळे याला ‘टोमॅटो फ्लू’ नाव पडले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. संशोधन सुरू आहे. हा ताप विषाणूजन्य आहे की चिकुनगुण्या किंवा डेंग्यूनंतरचे परिणाम म्हणून हा त्रास होतो, यावर अद्याप संशोधकांत एकमत होऊ शकलेले नाही. यामुळे पोटात अस्वस्थता, मळमळ, पोटात कळा, उलटय़ा, जुलाब, खोकला, शिंका, नाक वाहणे, थकवा, अंगाला खाज सुटणे, सांधेदुखी असेही त्रास होतात.

याचा प्रतिबंध आणि उपचार पुढीलप्रमाणे : वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात, की या तापामुळे येणारे फोड-पुरळ खाजवण्यापासून मुलांना रोखा. कारण त्यामुळे आणखी त्रास होतो. या तापात पुरेशा प्रमाणात आराम करणे गरजेचे आहे. यामुळे निर्जलीकरण होत असते. त्यामुळे द्रव पदार्थ घेण्याचे प्रमाण या काळात वाढवा. आपल्या मुलात अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. इतर फ्लूप्रमाणेच ‘टोमॅटो फ्लू’ हाही संसर्गजन्य रोग आहे. जर कुणाला याचा प्रादुर्भाव झाला तर त्या रुग्णास तातडीने विलगीकरणात ठेवावे.