कोपनहेगन : दुधासह एक कप कॉफीचे नियमित सेवन करत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. दुधासह कॉफी पिणे हे दाहशामक असल्याचे संशोधन कोपनहेगन विद्यापीठाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केले.
प्रथिने आणि अँटिऑक्सडंट्स एकत्र केल्यावर रोगप्रतिकारक पेशींमध्ये दाहविरोधी प्रभाव दुप्पट होतो, असे या तज्ज्ञांनी सांगितले. मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर हे वैद्यकीय तज्ज्ञ संशोधन करत आहेत. जेव्हा जिवाणू, विषाणू आणि अन्य अखाद्य पदार्थ शरीरात प्रवेश करतात, तेव्हा आपली रोगप्रतिकारक प्रणाली पांढऱ्या रक्तपेशा आणि रासायनिक पदार्थ आपल्या संरक्षणासाठी तैनात करून प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद सामान्यत: दाह किंवा जळजळ म्हणून ओळखला जातो. जेव्हा स्नायू किंवा स्नायूबंध यांचा अतिरिक्त भार शरीरावर पडतो, त्यावेळीही जळजळ होते.
संधिवातसारख्या आजारात तर हे दिसून येते. पॉलीफेनॉल म्हणून ओळखले जाणारे अँटिऑक्सिडंट्स वनस्पती, फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात. पॉलीफेनॉल हे मानवांसाठी आरोग्यदायी म्हणूनही ओळखले जातात, कारण ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे जळजळ होते. कोपनहेगन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी अमिनो अॅसिड, प्रथिनांचे बिल्डंग ब्लॉक्स यांच्या संयोगाने पॉलिफेनॉलचा परिणाम यावर संशोधन केले. पॉलिफेनॉल अमिनो आम्लावर प्रतिसाद देते. रोगप्रतिकारक पेशींमध्ये जळजळ होण्यापासून प्रतिबंध करता येतो. त्यामुळे दूध आणि कॉफी एकत्र घेतल्यास जळजळ थांबविण्यास फायदेशीर असल्याचे या संशोधनकांनी सांगितले.