नवी दिल्ली : जगभरात १९ मे हा दिवस प्रदाहक आंत्रविकार दिन (इन्फ्लेमेटरी बॉवेल सिंड्रोम डे) पाळला जातो. आतडय़ाच्या या प्रदाहक विकारांत मुख्यत्वे दोन प्रकार आढळतात. १) व्रणकारी बृहदांत्रशोथ (अल्सरेटिव्ह कोलायटिस)  २) क्रॉन विकार (क्रॉन्स डिसीज). ‘आयबीडी’ या संक्षिप्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विकाराचे प्रमाण भारतात वाढत आह़े, हा चिंतेचा  विषय आहे.

आहारातील बदलामुळे प्रामुख्याने पाश्चात्त्य जीवनशैली व आहारामुळे हा विकार वाढत आहे. पोटविकारासंबंधी ‘लॅन्सेट’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकातील संपादकीयमध्ये भारतासह दक्षिण आशियात ‘आयबीडी’चे प्रमाण नव्याने  लक्षणीयरीत्या वाढले आहे, असे म्हटले आहे. हा विकार पाश्चात्त्य देशांप्रमाणेच उत्तर भारतात आता बहुतांश प्रमाणात आढळतो. जनुकरचना, रोगप्रतिकारक क्षमता, बदललेली आहारशैलीमुळे हा विकार होतो.  स्त्री-पुरुषांना कोणत्याही वयोगटांत हा विकार होतो. तरीही २० ते ४० वर्षे वयोगटांत याचे प्रमाण जास्त आढळत आहे.  या रुग्णांत पोटदुखी, जुलाब, विष्ठेसह रक्तस्राव अशी लक्षणे आढळतात. पुरेशा माहितीचा अभाव, मोठय़ा आतडय़ाच्या सूक्ष्म कॅमेऱ्याद्वारे तपासणीच्या सोयीचा अभाव (कोलोनोस्कोपी), मूळव्याध, पोटाचा क्षयरोग किंवा कर्करोग झाल्याच्या समजुतीमुळे या विकाराचे निदान होण्यास विलंब होतो, असेही स्पष्ट केले आहे.

तज्ज्ञांच्या मते भारतात ‘आयबीडी’चे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पाश्चात्त्य आहारशैली, ताजी फळे, भाज्यांचा आहारात अभाव, कीटकनाशके, ताण, सूर्यप्रकाशाचा अभाव, भेसळयुक्त अन्न, प्रदूषित पाणी, रासायनिक प्रक्रियेने शुद्ध केलेले खाद्यतेल (रिफाइन्ड ऑइल) यामुळे आपल्या आतडय़ांवर दुष्परिणाम होतात. शरीरात असलेल्या चांगल्या जिवाणूंचा नाश होतो. जुलाब, पोटदुखी, विष्ठेसह रक्तस्राव अशी लक्षणे दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ राहिली तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने निदान करून घ्यावे.

वेदनाशामके आणि स्टिरॉइडचा वापर टाळावा. तसेच डाक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. औषधे घेताना नियमितता ठेवावी. मध्येच उपचार सोडून देऊ नयेत. वेळीच उपचार झाल्यास हा विकार आटोक्यात येऊ शकतो. जीवनशैलीत बदल, अधिक ताजे व पौष्टिक अन्न, दही-ताक-लस्सी सेवन करावी. सक्रिय आणि तणावमुक्त जीवन जगावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.