Benefits and side effects of figs: आयुर्वेदात ‘अमृत’ आणि आधुनिक आहारात ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाणारे अंजीर हे एक असे फळ आहे, जे केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही, तर औषधी गुणधर्मदेखील देते. अंजीर शरीराला बळकटी देते आणि पचन सुधारते, असे आयुर्वेदात म्हटले जाते. त्याचे सेवन केल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. ते फायबर, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, ज्यामुळे भरपूर पोषण मिळते. अंजीरचे नियमितपणे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यांसारख्या पचन समस्यांवरील उपचारास मदत होते. अंजीर फायबरने समृद्ध असल्याने, आतडे स्वच्छ करणे आणि पचनसंस्था मजबूत करणे यांसाठी मदत करतात. आयुर्वेदात अंजीराला टॉनिक मानले जाते म्हणजेच ते अशक्तपणा दूर करण्यास आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करतात.

हा एक सुका मेवा आहे, जो ताज्या आणि वाळलेल्या अशा दोन्हीही अवस्थांत खाल्ला जातो. वजन नियंत्रित करण्यासाठी अंजीर अत्यंत उपयुक्त ठरते. लोह, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असलेले हे छोटेसे फळ आरोग्यासाठी वरदान आहे. तुम्हाला माहीत आहे का की अंजीर, जे असंख्य आरोग्यदायी फायदे देते, ते काही विशिष्ट परिस्थितीत शरीरासाठी हानिकारकदेखील असू शकते?

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीपक कुमार यांना औषध आणि समुपदेशन क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. भारतातील हरिद्वार येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक चिकित्सकांपैकी एक डॉ. दीपक कुमार यांनी स्पष्ट केले की, आयुर्वेदानुसार प्रत्येक शरीराचे स्वरूप वेगळे असते. अंजीर सर्वांनाच आवडत नाही. परंतु, अनेकदा लोक अंजीराचे असंख्य फायदे लक्षात घेऊन, त्याबाबत नीट विचार न करता, ते खायला लागतात; परंतु नंतर त्यांना किडनी स्टोन, पोटदुखी किंवा रक्तातील साखर अचानक कमी होणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितले की, अंजीर फायदेशीर आहे; परंतु हे फळ खाणे पाच आजारांमध्ये आरोग्यासाठी विषारी ठरते. कोणत्या पाच लोकांनी अंजीर खाऊ नये ते जाणून घेऊया.

उच्च रक्तदाब असलेल्यांनी टाळावे

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी अंजीर काळजीपूर्वक खावे. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर असते; परंतु हे फळ उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये असंतुलन निर्माण करू शकते. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो. म्हणून अशा रुग्णांनी नियमितपणे अंजीर खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी हे टाळावे

रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांसाठी अंजीर हानिकारक असू शकते. अंजीरमधील नैसर्गिक संयुगे रक्त अधिक पातळ करू शकतात. त्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो, विशेषतः दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाल्यास. अशा व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय अंजीर खाणे टाळावे आणि त्यांच्या डोसकडे विशेष लक्ष द्यावे.

रक्तशर्करेचे प्रमाण जास्त असल्यास खाऊ नका

मधुमेही रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवायची असेल, तर त्यांनी अंजीर खाणे टाळावे. अंजीर हे नैसर्गिकरीत्या गोड फळ आहे आणि त्यात साखर असते. मधुमेहावर नियंत्रण नसलेल्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अंजीर रवेगाने वाढवू शकते. सुक्या अंजीरमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून मधुमेहींनी अंजीर खाण्यापूर्वी त्यांच्या साखरेची पातळी तपासावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटाचा खूप त्रास असल्यास वर्ज्य करा

ज्या लोकांना वारंवार जुलाब, पोटदुखी किंवा गॅसचा जास्त त्रास होतो, त्यांनी अंजीर टाळावे. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनक्रिया बिघडलेल्यांचा अतिसार वाढवू शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात पेटके आणि अस्वस्थतेचाही त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत अंजीरचे सेवन मर्यादित करणे किंवा पूर्णपणे टाळणे चांगले.

गर्भवती महिला

गरोदरपणात अंजीर खाणे धोकादायक ठरू शकते. म्हणून त्यांचे सेवन काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. अंजीर शरीरातील उष्णता वाढवू शकते आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाच्या समस्या उदभवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, ते रक्तातील साखर आणि पचनावरदेखील विपरीत परिणाम करू शकते. म्हणून गर्भवती महिलांनी अंजीर खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.