scorecardresearch

आरोग्यवार्ता : करोनानंतर दोन वर्षांनीही मेंदू-मानसिक विकारांची जोखीम

करोनातून मुक्त झाल्यानंतर दोन वर्षांनीही मेंदूविकार आणि मानसिक विकारांची जोखीम जास्त असते.

आरोग्यवार्ता : करोनानंतर दोन वर्षांनीही मेंदू-मानसिक विकारांची जोखीम
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : करोनातून मुक्त झाल्यानंतर दोन वर्षांनीही मेंदूविकार आणि मानसिक विकारांची जोखीम जास्त असते. स्मृतिभ्रंश आणि फीट येण्याची जोखीम करोनामुक्त झाल्यानंतर दोन वर्षांनीही जास्तच असते. नैराश्य, चिंता विकारांचे प्रमाणही करोनामुक्तांमध्ये इतर श्वसनविकारांच्या तुलनेत दोन वर्षांनंतरही जास्त आहे. सुमारे साडेबारा लाखांवर रुग्णांच्या आरोग्यविषयक नोंदीचे विश्लेषण करून  ‘लॅन्सेट सायकियाट्री जर्नल’ या विज्ञानपत्रिकेत या संबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या संशोधन गटाने यापूर्वी केलेल्या अभ्यास अहवालानुसार करोना मुक्त झालेल्यांना मेंदूविकार आणि मानसिक विकाराची जोखीम सहा महिन्यांपर्यंत राहते, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र, आता मोठय़ा संख्येने रुग्णांच्या आरोग्य नोंदीचे विश्लेषण केल्यानंतर नवीन निष्कर्ष समोर आले आहेत. हे नवे निष्कर्ष रुग्ण आणि आरोग्यसेवांसाठी महत्त्वाचे आहेत. करोनामुक्त झाल्यावरही अशा विकारांची जोखीम का राहते, यावर सखोल संशोधनाची गरज या नव्या निष्कर्षांनंतर अधोरेखित होते. त्यावर कोणते प्रतिबंधक उपाय अथवा उपचार करावेत, यावर संशोधन गरजेचे आहे. या अभ्यासात १४ प्रकारच्या मेंदूविकार आणि मानसिक विकारांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. प्रामुख्याने अमेरिकेतील करोनामुक्त रुग्णांच्या दोन वर्षांतील नोंदींचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या नोंदींची इतर श्वसनविकार झालेल्या रुग्णांच्या नोंदीशी तुलना करण्यात आली.

प्रौढांप्रमाणे मुलांमध्येही फीट येणे, मानसिक असंतुलनाचे प्रमाण ‘कोविड’मुक्त झाल्यानंतर जास्त आढळले. कोविड साथीनंतर सहा महिन्यांनंतर आणि करोनाच्या ‘अल्फा’ विषाणूचा संसर्ग वाढण्यापूर्वी व नंतर काही काळ मेंदूविकार आणि मानसिक विकारांच्या जोखमींत थोडासा बदल जाणवला. तथापि, ‘डेल्टा’ प्रकाराच्या संसर्गानंतर पहिल्या सहा महिन्यांत अपस्मार किंवा फेफरे आणि पक्षाघाताच्या जोखमींत लक्षणीयरीत्या वाढ आढळली. मात्र ‘डेल्ट’’च्या लाटेत आधीच्या लाटेच्या तुलनेत स्मृतिभ्रंशाची जोखीम कमी आढळली. ‘ओमायक्रॉन’च्या लाटेतही ‘डेल्टा’प्रमाणेच या विकारांची जोखीम आढळली. मात्र, यातील दिलासादायक बाब म्हणजे करोना झाल्यानंतर नैराश्य आणि चिंता विकारांची अतिजोखीम अल्पकाळच टिकली आणि मुलांमध्ये हे प्रमाण वाढलेलेही दिसले नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या