आरोग्यवार्ता : हिरडय़ांच्या आरोग्याची काळजी महत्त्वाची!

मौखिक आरोग्याची नियमित काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र, बहुसंख्य लोक ते गांभीर्याने घेत नाहीत.

नवी दिल्ली : मौखिक आरोग्याची नियमित काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र, बहुसंख्य लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. दात व हिरडय़ांचे आरोग्य आपल्या एकूण आरोग्याशी संबंधित असते. दंतवैद्यक तज्ज्ञांच्या मते एखाद्याचे सर्व दात किडलेले नसले, तरी दाताभोवतींच्या हिरडय़ांचे आरोग्य नीट नसेल तर त्यांचे विकार होऊन दातांना धोका पोहोचू शकतो.

हिरडय़ा लाल होणे, त्यांना सूज येऊन दुखणे इथपासून त्यांच्या गंभीर विकारात पेशींचा नाश होऊन दातांचा आधार असलेल्या जबडय़ाच्या हाडालाही इजा पोहोचते. परिणामी दात पडतात. ‘जिंजिव्हिटिस’ या हिरडय़ांच्या प्राथमिक विकारात हिरडय़ांतून रक्त येणे, दाताखालील भागांत त्या लाल होऊन सुजणे असा त्रास होतो.  वेळीच लक्ष न दिल्यास ‘पेरिओडाँटिटिस’ हा हिरडय़ांचा गंभीर विकार होऊ शकतो. त्यात हिरडय़ांच्या मऊ उतींचा (सॉफ्ट टिश्यू)  नाश होऊन दातांचा पाया नष्ट न झाल्याने पडतात. हिरडय़ांच्या समस्यांची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास संभाव्य विकारांवर मात करता येते. ती लक्षणे पुढीलप्रमाणे :

हिरडय़ांचा रंग बदलणे : हिरडय़ांचा नेहमीचा गुलाबी रंग बदलून त्या पांढऱ्या, गडद लाल किंवा काळसर दिसू लागल्यास त्यांच्या विकाराची सुरुवात असू शकते.

हिरडय़ा ठसठसणे : खाताना किंवा खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर हिरडय़ांमध्ये तीव्र वेदना, ठसठस होत असल्यास त्यांच्या विकाराचा मोठा संभव असतो.

हिरडय़ांतून रक्त येणे : बोटांच्या अलगद स्पर्शानंतर किंवा दातांचा ब्रश लावल्यानंतर हिरडय़ांत वेदना होऊन रक्तस्राव होत असेल तर हिरडय़ांच्या विकाराची शक्यता असते.  तज्ज्ञांच्या मते हिरडय़ा दातांचा आधार असतात. दातांच्या मुळांना दंतकिडीपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्यांची नियमित काळजी घेणं नितांत गरजेचं असतं. त्यांनी त्यासाठी करायचे सोपे उपाय सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार आपले दात दिवसातून किमान दोनदा घासावेत. त्यामुळे दंतकीड, दात सळसळणे आणि त्यावर किटण चढणे रोखता येते. दोन-तीन मिनिटे दात घासावेत. दातांच्या प्रत्येक भागात ३० सेकंदापर्यंत ब्रश करावे. प्रत्येक दात स्वच्छ करावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य टूथपेस्ट निवडावी. चांगल्या ‘माऊथवॉश’ने नियमित मुखशुद्धी करावी. ‘माऊथवॉश’दातांच्या  प्रत्येक भागात पोहोचतात. हिरडय़ांच्या मृदू उतींपर्यंत पोहोचून हा भाग त्याने र्निजतुक होतो. पुदिना, कडुनिंब, डाळिंब, मेस्वाक किंवा पुदिनायुक्त ‘माऊथवॉश’ निवडावा. हिरडय़ा व दातांच्या आरोग्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. हिरडय़ांचा नियमित हळुवारपणे मसाज करावा. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते.  त्यासाठी पूरक औषधांचा वापर करता येतो. औषधी तेलाने तोंडावाटे खळखळून चुळा भरल्याने हिरडय़ांचे आरोग्य चांगले राहते. किटणही चढत नाही. धूम्रपानापासून दूर रहा. फळे, भाजीपाला, धान्यांचा संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा. दंतवैद्याकडून वर्षभरातून एकदा तपासणी करून घ्यावी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news care gum health important regular care teeth gums health ysh

Next Story
तुम्हीही रात्री जेवल्यानंतर आंबा खाता का? जाणून घ्या याचे शरीरावर होणारे परिणाम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी