health news counseling for breastfeeding Issues is helpful zws 70 | Loksatta

आरोग्यवार्ता :  स्तनपान समस्यांसाठी सल्लागाराचे मार्गदर्शन उपयुक्त

डॉक्टरांच्या मते स्तनपान ही वैयक्तिक बाब आहे. परंतु पहिले सहा महिनेतरी बाळाला स्तनपान दिले पाहिजे.

आरोग्यवार्ता :  स्तनपान समस्यांसाठी सल्लागाराचे मार्गदर्शन उपयुक्त
प्रतिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : मातृत्व प्राप्त झाल्यावर आपल्या अर्भकाला स्तनपान करण्यासाठी बहुसंख्य मातांना मार्गदर्शनाची गरज असते. अशांच्या मार्गदर्शनासाठी स्तनपान सल्लागारांची मदत होते. ते या मातांना स्तनपानासंबंधी सुयोग्य सल्ले, मार्गदर्शन देतात. अशा सल्लागारांची प्रसूतीनंतर पहिल्या काही आठवडय़ांसाठी गरज असते, जेव्हा बाळ स्तनपान करणे शिकत असते. गर्भारपणाच्या काळातच, प्रसुतीनंतर, काही आठवडे, महिन्यांपर्यंतही स्तनपान सल्लागारांचा सल्ला घेता येतो.

डॉक्टरांच्या मते स्तनपान ही वैयक्तिक बाब आहे. परंतु पहिले सहा महिनेतरी बाळाला स्तनपान दिले पाहिजे. काही मातांना दुखऱ्या स्तनाग्रांमुळे, अपुऱ्या दुधामुळे हे स्तनपान थांबवावेसे वाटते. या समस्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शनासाठी स्तनपानविषयक सल्लागाराची गरज असते. हे सल्लागार संबंधित मातेला भावनिक आधार व प्रोत्साहन देतात. स्तनापानाची प्रक्रिया भावनिक आणि शारीरिक असते. स्तनपान सल्लागारांच्या योग्य सल्ल्याने हा अनुभव सुखद होण्यास व काही समस्या सुटण्यास मदत होते. स्तनपानाची सुयोग्य सवय लावण्यासाठी बाळाच्या जन्मानंतर पहिले काही आठवडे महत्त्वाचे असतात. स्तनपान सल्लागार तुमच्या आरोग्याच्या इतिहासाचे आणि बाळाच्या आरोग्याशी संबंधित इतर माहिती घेऊन त्यानुसार सल्ला देतात. स्तनपानाचे निरीक्षण करून, योग्य पद्धत सुचवतात.

पुढील समस्या असल्यास स्तनपान सल्लागाराची मदत उपयोगी ठरते :

*  स्तनपानाच्या सुरुवातीच्या दिवसांत स्तनांमध्ये बदल होतात. त्यात प्रसंगी सूज, घट्टपणा व स्तनांच्या आकारात वाढ होते. पहिल्या ३ ते ५ दिवसांत हा त्रास होण्याची शक्यता असते.

* जर स्तनाग्रे अतिसंवेदनशील, चिरा पडलेली, दुखरी असतील तर

* पुरेशा प्रमाणात दूध बाळाला मिळत नसेल तर

* बाळाला स्तनपान करताना कसे बसावे, कशा पद्धतीने स्तनपान बाळाच्या हिताचे ठरेल याच्या मार्गदर्शनासाठी

* जर स्तनदाहासारखा संसर्ग असेल तर, प्रसूतीनंतर पहिल्या तीन महिन्यांत वेदनादायक संसर्गाचा त्रास उद्भवल्यास

* बाळाला स्तनाग्रे नीट ओठांत धरून दूध शोषता येत नसेल तर

* स्तनपान सुरू करून अनेक दिवसांनीही आपल्या बाळाचे वजन वाढत नसेल तर

* जर बाळ स्तनपान करण्यास नकार देत असेल तर

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-08-2022 at 05:44 IST
Next Story
आता सुईशिवाय रक्तातील साखरेची चाचणी होणार! स्मार्ट नेकलेस बँड करणार सर्व कामे