scorecardresearch

आरोग्यवार्ता : अतिरिक्त वायू, पोटातील गच्चपणावर उपाय

जेवल्यानंतर पोटात गच्चपणा जाणवत असल्याने अस्वस्थतेचा अनुभव आपल्याला कधी ना कधी येतो.

Stomach-Sound

नवी दिल्ली : जेवल्यानंतर पोटात गच्चपणा जाणवत असल्याने अस्वस्थतेचा अनुभव आपल्याला कधी ना कधी येतो. हा त्रास होत असल्याने अनेकांना खावेसेच वाटत नाही. असे होण्यामागे अनेक कारणे असतात. आहारतज्ज्ञांच्या मते आपल्या पोटात ज्या वेळी ताण असतो, अन्नपदार्थ आणि वायूमुळे त्यात जागा असल्याने गच्चपणा वाटू लागतो. बद्धकोष्ठता, अपचन, अन्नपदार्थ खाताना त्यासोबत हवेचे सेवन जास्त होणे, पोटविकार, प्रदाहक आंत्र विकार (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) आदी कारणांमुळे पोटात वायूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे हा त्रास होतो.

 पोटात वायू तयार  होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण तो दीर्घ काळ राहिल्यास गच्चपणा व पोट फुगण्याचा त्रास होतो. सतत ढेकर येत राहतात. वात सुटत राहतो. पोटातून आवाज येत राहतात. कडधान्ये, कांदे, ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी खाल्ला असल्यास हा त्रास वाढू शकतो. मैद्यातील ‘ग्लुटेन’ व दुग्धजन्य पदार्थामुळे हा त्रास होतो. हा त्रास ज्यांना सातत्याने होतो त्यांनी आहारातील या पदार्थाचे प्रमाण कमी करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. जेवताना, खात असताना खूप बोलू नये आणि आणि घाईगडबडीत घास गिळू नयेत. त्यामुळे अन्नासह हवाही पोटात जास्त प्रमाणात जाऊन हा त्रास होतो. अन्नसेवन करताना ताठ बसून खावे. तोंड बंद करून घास चघळावेत. तसेच त्यासह कार्बन वायूप्रक्रिया केलेली पेये (सॉफ्ट िड्रक) टाळावीत.

 पोटातील गच्चपणा जाणवल्यास जेवणानंतर शतपावली करावी. संथ चालताना दर दहा पावलांनंतर पोट आकुंचित करण्याचा दोन-तीनदा प्रयत्न करावा. त्यामुळे पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होईल. ‘हस्तपादांगुष्ठासना’सारखी काही आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावीत. लिंबू व आल्याचे पाणी घेतल्याने पचन होऊन, हा त्रास थांबतो. तणावरहित अवस्थेत सावकाश भोजन करावे. कधी तरी हा त्रास झाल्यास घरगुती उपचार करा. परंतु कोणत्याही आहारानंतर, पथ्ये पाळूनही असा त्रास वारंवार होत असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news excess gas remedy stomach cramps eating stomach ysh

ताज्या बातम्या