आरोग्यवार्ता : संधिवाताच्या त्रासात अन्नसेवनाची पथ्थे उपकारक

शारीरिक क्षमता चांगली ठेवण्यासाठी व सांध्यांच्या आरोग्यासाठी अन्नसेवनाची पथ्ये पाळणेही गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

आरोग्यवार्ता : संधिवाताच्या त्रासात अन्नसेवनाची पथ्थे उपकारक
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : सध्या संधिवात किंवा सांध्यांचे दुखणे हा बहुसंख्यांना भेडसावणारा विकार झाला आहे. शिवाय एका विशिष्ट वयात तो होतो, असेही नाही. या विकारात अनेक सांध्यांना एकाच वेळी त्रास होतो. त्यामुळे दैनंदिन हालचाली व शारीरिक क्रिया सामान्यपणे करता येणे कठीण जाते. कार्यालयात दीर्घ काळ बैठे काम केल्याने शरीरात ताठरपणा येत असेल, पायऱ्या चढताना त्रास होत असेल, तर संधिवाताची शक्यता असते. त्यामुळे नियमित व्यायाम गरजेचा असतो. शिवाय त्यासह आपली शारीरिक क्षमता चांगली ठेवण्यासाठी व सांध्यांच्या आरोग्यासाठी अन्नसेवनाची पथ्ये पाळणेही गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संधिवाताच्या रुग्णांसाठी आहारतज्ज्ञ पुढील अन्नाचे सेवन करणे टाळण्याचे सुचवतात. संधिवातात सांध्यांभोवती सूज येते. तेथे वेदना होतात. कडकपणा जाणवतो. येथील सूज दीर्घ काळ राहते किंवा ओसरून पुन्हा येते. त्यामुळे या भागातील उतींचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची जोखीम असते. अशा वेळी आहारात बदल केला, तर ही लक्षणे सौम्य होण्यास दत होते. संधिवाताच्या रुग्णांनी युरिक आम्ल वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे. त्यात काही प्रकारचे मासे, शिंपले, कॉड फिश, मटणाचे अतिसेवन टाळावे. त्यामुळे शरीरात युरिक आम्लाची मात्रा वाढून संधिवाताचा त्रास होऊ शकतो. संधिवाताच्या रुग्णांनी रिफाइन्ड साखर, रिफाइन्ड पीठ, रिफाइन्ड तेल, प्रक्रियायुक्त मटण, मोनोसोडियम ग्लूटामेट किंवा सोडियम ग्लूटामेट असलेले चीज-टोमॅटो, प्रथिन पूरके टाळावीत. त्यामुळे सांध्यांना सूज येते. सततच्या सूज येण्याच्या त्रासाने संधिवाताचे रुग्ण त्रस्त होतात. त्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने इतर उपायांसह आहाराची ही पथ्ये पाळल्यास त्रास कमी होण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Tips and tricks: बाथरूमचे दरवाजे पाण्यामुळे खराब झाले आहेत? त्यांना वॉटर प्रूफ बनवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
फोटो गॅलरी