Kidney Failure Due To Supplements: जिममध्ये तासनतास घाम गाळणे, पिळदार शरीर कमावणे आणि फिट दिसणे ही आजच्या तरुणाईची क्रेझ बनली आहे. पण हीच क्रेझ जेव्हा ‘वेडात’ रूपांतरित होते आणि सोबतीला तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या सप्लिमेंट्सचा मारा होतो, तेव्हा त्याचे परिणाम जीवावर बेतू शकतात. जिम सप्लिमेंट्सच्या अतिसेवनामुळे एका २४ वर्षीय तरूणाची किडनी निकामी झाली. जेव्हा त्याच्या लघवीचा रंग कोल्ड्रिंकसारखा झाला, तेव्हा त्या तरूणाची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्याला तातडीने डायलिसिसिवर ठेवावे लागले.

वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, प्रोटीन पावडर आणि क्रिएटिनसारख्या सप्लिमेंट्सच्या चुकीच्या सेवनामुळे शरीराच्या गाळण प्रणालीवर म्हणजेच किडनीवर अतिरिक्त ताण येतो.

मॅक्स हेल्थकेअरमधील इंटर्नल मेडिसिनचे संचालक डॉ. टिकू यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो २४ वर्षीय इंजिनिअर त्यांच्याकडे आला, तेव्हा तो खूप थकलेला दिसत होता आणि त्याच्या लघवीचा रंग काळ्या कोल्ड्रिंकसारखा झाला होता. त्याला स्नायूदुखी, मळमळ आणि थओडा गोंधळही जाणवत होता. प्रोटीन पावडर आणि क्रिएटिनचे अतिसेवन तुमच्या शरीराची ‘चाळण’ कशी करू शकते? जिम ट्रेनरवर आंधळा विश्वास ठेवणे तुम्हाला किती महागात पडू शकते? तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

डायलिसिसचा आधार का?

डॉक्टरांनी सांगितले की, तो तरूण नियमितपणे जिममध्ये जात असे आणि त्याला आपल्या शरीरात झटपट बदल घडवून आणायचे होते. या गडबडीत त्याने आपल्या जिम ट्रेनरवर आंधळेपणाने विश्वास ठेवला. जिम सप्लिमेंट्सच्या अतिसेवनामुळे त्या तरूणाच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला. शरीरातील विषारी द्रव्ये आणि टाकाऊ पदार्थ काढण्यासाठी रूग्णाला तातडीने डायलिसिस आणि सलाईनची गरज होती, नाही तर परिस्थिती सेप्लिसपर्यंत पोहोचू शकली असती. डॉक्टरांनी सांगितले की, एका जिम तज्ज्ञाने त्या तरूणाला सप्लिमेंट पावडर घेण्याचा सल्ला दिला होता. तो दररोज २ ते ३ स्कूप व्हे प्रोटीन, ५ ग्रॅम ऊर्जा वाढवणारे क्रिएटिन आणि तितकीच कोलेजन पावडर घेत होता. एवढंच नाही तर, त्याच्या आहारातही भरपूर प्रोटीन होते. त्यामुळे त्याचे एकूण प्रोटीनचे सेवन दररोज अंदाजे १५० ग्रॅम होत होते. ते त्याच्या शरीराच्या गरजेपेक्षा खूप जास्त होते.

यापैकी बहुतेक सप्लिमेंट्, स्वस्त, स्थानिक ब्रँडचे होते आणि त्यांचे लेबलिंग अस्पष्ट होते. सुरूवातीच्या परिणामांनी उत्साहित होऊन त्या तरूणाने आपल्या व्यायामाची तीव्रता वाढवली. एका महिन्यात त्याचे वजन ३ किलो वाढले, त्याला त्याने स्नायूंची वाढ झाले असे समजले. त्यानंतर त्याच्या शरीरात काही धोक्याची चिन्हे दिसू लागली. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. लक्षणे दिसू लागल्यानंतर चार आठवड्यांनी त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्याच्या किडन्यांना इजा झाली.

सप्लिमेंट्सच्या अतिसेवनाने किडनीला धोका

या तरूणाच्या शरीरातील क्रिएटिनिन, जे निरोगी किडनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाणारे एक टाकाऊ उत्पादन आहे. ते ३.२ mg/dl पर्यंत पोहोचले होते. याची सामान्य पातळी ०.७-१.४ mg/dl असते. हे तीव्र किडनीची दुखापत असल्याचे दर्शवते. क्रिएटिन फॉस्फोकिनेज जे स्नायूंचे विघटन दर्शवते, ते १२,०००U/Lपर्यंत वाढले होते, तर याची सामान्य पातळी २०-२०० U/L असते. मायोग्लोबिन जे स्नायूंच्या विघटनावेळी स्त्रवणारे एक विषारी प्रोटीन आहे. ते लघवीवाटे शरीराबाहेर टाकले गेले. लिव्हरमधील एन्झाइम्सची पातळीसुद्धा वाढली होती. एकूणच त्याच्या दोन्ही किडनी निकामी होण्याच्या अवस्थेत होत्या. हे अनेक धोक्याच्या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे घडले होते.

क्रिएटिनचे अतिरिक्त सेवन, प्रोटीन्सचे अतिरिक्त सेवन, तीव्र व्यायाम आणि पुरेसे पाणी न पिणे ही मुख्य कारणे होती. डॉक्टरांना असाही संशय होता की, सप्लिमेंट पावडरमध्ये भेसळ असू शकते. सर्वात मोठी चूक ही होती की त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही आणि केवळ जिमच्या सल्ल्यावर अवलंबून राहिला.

प्रोटीनच्या अतिसेवनाचे परिणाम

स्नायूंच्या दुरूस्तीसाठी प्रोटीन आवश्यक आहे, मात्र जास्त प्रोटीन घेतल्याने स्नायू वाढतात हा समज वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहे. शरीर केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रोटीनचा वापर करू शकते. अतिरिक्त प्रोटीन टाकाऊ पदार्थ बनतात, ते किडनीला गाळावे लागतात. स्पोर्ट्ससाठीच्या पोषणानुसार, खेळाडूंसाठी शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम १.२-२.० ग्रॅम प्रोटीन पुरेसे आहे, तर सामान्य व्यक्तींसाठी प्रति किलोग्रॅम ०.८ ग्रॅम प्रोटीन पुरेसे आहे. प्रति किलोग्रॅम २-३ ग्रॅम पेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यास किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. दीर्घकाळ असे केल्याने किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, अतिरिक्त प्रोटीन घेतल्याने पोट फुगणे, आम्लपित्त जठरदाह आणि आम्लपित्त यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

क्रिएटिनचा अतिवापर धोकादायक

योग्य प्रकारे घेतल्यास क्रिएटिन सुरक्षित मानले जाते. योग्य मात्रा ही सेवन केलेल्या पाण्याच्या प्रमाणावर आणि व्यायामावर अवलंबून असते. क्रिएटिन स्नायूंमध्ये पाणी साठवून ठेवते, त्यामुळे वेगाने वजन वाढू शकते आणि अधिक पाण्याची गरज भासू शकते. पुरेसे पाणी न प्यायल्यास स्नायू पेटके, पोटाच्या समस्या आणि इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते. तीव्र व्यायामासोबत घेतल्यास लघवीचा रंग गडद होण्याचा धोका वाढतो. या स्थितीला रॅबडोमायोलिसिस म्हणतात. यामध्ये स्नायूंचे विघटन होते आणि मायोग्लोबिन रक्तप्रवाहात सोडले जाते. यामुळे किडनीला नुकसान पोहोचू शकते.

कोलेजन पावडर त्वचा आणि सांध्यांसाठी फायदेशीर अशल्याचे म्हटले जाते. मात्र ती पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यांची सूत्रे वेगवेगळी असतात आणि अनेकांमध्ये कॅल्शियम, स्वादवर्धक, संरक्षक आणि रंग यांचे प्रमाणजास्त असते, त्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो आणि हार्मोनल असंतुलन होऊ शकते. जर एखआदी व्यक्ती संतुलित आहार घेत असेल, तर त्यांना कोलेजन सप्लिमेंट्सची गरज भासणार नाही.

सप्लिमेंट्स एकत्र खाण्याचे धोके

व्हे प्रोटीन, क्रिएटिन आणि कोलेजन हे स्वतंत्रपणे घेतल्यास सुरक्षित वाटू शकतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते एकत्र घेतल्यास शरीरावर ताण वाढतो. अतिरिक्त प्रोटीनमुळे किडनीवर ताण येतो, क्रिएटिनमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते आणि तीव्र व्यायामामुळे स्नायूंचे नुकसान होते. शरीरात पाण्याची कमतरता अशल्यास किडनी हे विषारी पदार्थ बाहेर टाकू शकत नाही. तसंच थकवा, गडद रंगाची लघवी आणि स्नायूदुखी यासारख्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही सप्लिमेंट घेणे जीवघेणे ठरू शकते. चुकीच्या पद्धतीने सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते.