नवी दिल्ली : आपल्या केस गळताना पाहणे वेदनादायी असते. उन्हाळय़ात हिवाळय़ाच्या तुलनेत जास्त केस गळतात. त्याला निश्चित कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते उन्हाळय़ात आपल्या डोक्यावर घामाचे प्रमाण वाढते. उष्णता, क्लोरिन प्रमाण वाढणे, उन्हाच्या संपर्कामुळे केसांची हानी होते. ते कमजोर, रूक्ष होतात अन् शेवटी गळतात.

उन्हाळय़ात कडक ऊन, प्रदूषण व कोरडय़ा वातावरणाने डोक्यावरची त्वचाही रुक्ष होते. त्याचा केसांवरही परिणाम होतो. केस कोरडे, कमी चमकदार बनतात. सूर्य आणि उष्ण वाऱ्यांनी आपल्या शरीरावर परिणाम होतो. या काळात आपली पचनशक्ती मंद होते. त्यामुळे शरीरातील उतींचे पुरेसे पोषण होत नाही. त्यामुळे केसांचे कुपोषण होते.

या काळात केसांची काळजी कशी घ्यावी, याचा सल्ला तज्ज्ञ देतात. ते असे : उन्हाळय़ात केस टॉवेलनेच सुकवा. त्यासाठी हेअर ‘ड्रायर’ वापरू नका. या काळात केसांचा उष्म्याशी फार संपर्क होऊ देऊ नका. केशरचनेसाठी रासायनिक प्रक्रिया करू नका. या काळात केस शक्यतो घट्ट बांधून ठेवावेत. नैसर्गिक तत्त्वे असलेले चांगल्या ‘शाम्पू’, ‘कंडिशनर’चा वापर करा. रसायनयुक्त उत्पादनांनी केसांचे आणखी नुकसान होते. केसांसाठी खास बनवलेली उत्पादने वापरा. आवळय़ाचे तेल वापरा. गरम आवळा तेल व त्याचे मालिश आठवडय़ातून एकदा करा. रूक्ष केसांसाठी ते उपयोगी ठरते. केस नियमित कापून त्यातील रुक्ष भाग, मृतप्राय भाग व दुहेरी टोक झालेले भाग कापून टाकावेत. आंघोळीनंतर केसांना टॉवलने जास्त घासू नये. त्यातील पाणी टिपण्यासाठी टॉवेल त्याभोवती बांधून ठेवा. केस थोडे ओलसर असतानाच त्याला ‘सीरम’ लावा. त्यामुळे त्यात गुंता होणार नाही.

प्रतिबंधक उपाय म्हणून टोपी किंवा रुमाल वापरा त्यामुळे उन्हाने केसांचे नुकसान होणार नाही. केसांसाठीच्या योग्य तेलाने हलक्या हातांनी नियमित मसाज करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.