आरोग्यवार्ता : ‘हार्निया’चा स्त्रियांना अधिक त्रास

स्त्रियांमध्ये मांडीच्या सांध्याच्या भागातील उती जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा तो भाग फुगतो आणि वेदनाही होतात

आरोग्यवार्ता : ‘हार्निया’चा स्त्रियांना अधिक त्रास
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : ‘हार्निया’ हा विकार स्त्री-पुरुष दोघांनाही होण्याची शक्यता असते; परंतु ओटीपोटाजवळ मांडीच्या सांध्याजवळील ‘हार्निया’ होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

स्त्रियांमध्ये मांडीच्या सांध्याच्या भागातील उती जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा तो भाग फुगतो आणि वेदनाही होतात. परिणामी आतडय़ांवरील दाब वाढल्याने रुग्णाची अस्वस्थता वाढल्याने तातडीने उपचारांची गरज पडते.

स्थूलत्व, जड वस्तू उचलणे, खोकल्याचा दीर्घकाळ त्रास, दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अनेकदा गर्भारपण व कुटुंबातील आनुवंशिकतेमुळे हा विकार होण्याची शक्यता वाढते. स्त्रियांमध्ये ‘इनडायरेक्ट इनगिनल हार्निया’चे प्रमाण अधिक आढळते. ‘फिमोरल हार्निया’ही (ओटीपोटाच्या खाली आणि मांडीमध्ये) स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. मात्र याविषयी माहिती नसल्याने अचूक उपचार होत नाहीत.

मांडीजवळ होणाऱ्या ‘हार्निया’ची लक्षणे सहसा आढळत नाहीत. मात्र, काही रुग्णांना ओटीपोटात खाली व मांडीच्या भागात वेदना होतात. लक्षणे दिसत नसल्यास निदान व उपचारांना विलंब होऊ शकतो.

वजन उचलणे, खोकला, शिंक, खूप वेळ उभे राहणे किंवा बसणे अशासारख्या ताण येणाऱ्या हालचाली झाल्यास वेदना व अस्वस्थता वाढते. मांडीच्या भागात सुई टोचल्यासारख्या वेदना होणे अथवा दाह होणे, अशीही लक्षणे आढळतात. अनेक स्त्रियांना ओटीपोटात व पोटाच्या खालच्या भागात असह्य वेदना होतात.  अशा वेळी दुर्लक्ष न करता उपचार करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. निदानानंतर गरजेनुसार रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक तंत्रांसह नेमक्या शल्यचिकित्सेचा पर्याय तज्ज्ञ अवलंबतात. त्यामुळे असा त्रास जाणवल्यानंतर त्वरित निदान व उपचार केल्यास वेदना आणि अस्वस्थतेपासून मुक्ती मिळवता येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिफॉन साडी नेसायला आवडते?; जाणून घ्या कशी घ्यावी काळजी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी