नवी दिल्ली : सध्या देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आली आहे. कमाल तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. पुढील काही दिवस ही लाट अधिक तीव्र होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तीव्र उष्णतेचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. या वातावरणात निर्जलीकरण, पेटके येणे, प्रचंड थकवा जाणवणे व उष्माघातासारखा घातक त्रासही होऊ शकतो. उन्हापासून बचाव करणारे कपडे घालणे, घरात गारवा ठेवणे असे उपाय तर आपण करतोच, याचबरोबर या काळात निरोगी राहण्यासाठी सुयोग्य आहार आणि पोषक तत्त्वे शरीराला मिळणे गरजेचे असते. आहारतज्ज्ञांच्या मते, या काळात घेतलेल्या पोषक आणि सुयोग्य आहारामुळे आपले आरोग्य चांगले राहते. या काळात उष्णतेस पोषक आहार टाळावा. शरीरातील थंडावा वाढेल, असा आहार घ्यावा. त्यामुळे शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.

या काळात घ्यावयाचा आहार : उन्हाळय़ात शरीराला सदैव योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे नियमित पाणी प्यावे. भाज्यांचा रस, नारळपाणी, सातू, ताक आणि लिंबू सरबत घ्यावे. कॅफिन असलेली चहा-कॉफीसारखी पेये टाळावीत. त्यांच्यामुळे निर्जलीकरण होते. काकडी, टरबूज, खरबूज आणि टोमॅटो अशी पाण्याचे प्रमाण चांगले असणारी फळे खावीत. काकडीची कोशिंबीर, रस घ्यावा. या काळात टरबूज मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यात भरपूर पाणी असते. ते खावे. टोमॅटोत ‘क’ जीवनसत्त्व व भरपूर पाणी असते. त्यांचा आहारात समावेश असावा. बडीशेप थंड असते. सकाळी बडीशेपेचे पाणी घेतल्यास शरीरात थंडावा राहतो. जिरेसुद्धा थंड असतात. फळांच्या रसासह अथवा नुसते पाण्यात घालून जिऱ्याचे पाणी प्यावे. दही आणि दह्यापासून बनवलेले ताकासारखे पदार्थ हे थंडगार असल्याने उन्हाळय़ात आरोग्यासाठी चांगले असतात.