नवी दिल्ली : केसगळतीची समस्या पुरुषांसह स्त्रियांनाही भेडसावते. या समस्येमागे असंतुलित आहार, प्रदूषण आणि ताणतणाव आदी कारणे आहेत. इतरही अनेक कारणे या गळतीमागे असू शकतात. ती रोखण्यासाठी अनेक जण घरगुती उपाय करतात. त्यामुळे फायदा होण्याऐवजी इजाच होण्याचा अधिक धोका असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

केस गळण्यापासून रोखण्यासाठी बऱ्याच घरगुती उपायांमागे गैरसमजच जास्त असतात. प्रत्यक्षात केसगळती रोखण्यास त्याचा फायदा होत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. त्यापैकी काही गैरसमज पाहूयात. तेलाच्या मसाजाने केसगळती थांबते, असा एक मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात अशा मसाजाने तणाव दूर होऊन आराम मिळतो. पण गळती थांबू शकत नाही. केसगळती थांबवणाऱ्या शाम्पूचाही काही फायदा होत नसतो. त्यात असे कोणतेही घटक नसतात. त्याने केस फक्त स्वच्छ होतात. गळती होते म्हणून काही जण शाम्पू वापरणे थांबवतात. परंतु तज्ज्ञांच्या मते आरोग्यासाठी केस नियमित स्वच्छ करणे गरजेचे असते. गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरतो, असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. यावर लिंबू व दही उपयोगी आहे. दह्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. मात्र, लिंबाचा वापर केसांसाठी करू नये. केसांसाठी घरी तयार केलेले पॅकही फारसे उपयोगी पडत नाही. ब जीवनसत्त्वयुक्त पूरकेही गळती रोखण्यासाठी प्रभावी ठरत नाहीत. केस कापून कमी लांबीचे ठेवण्याने केस गळती लक्षणीयरीत्या दिसत नाही एवढेच. ही गळती थांबत नाही. केसांच्या ‘स्पा’मुळे त्यांची निगा राखली जाते परंतु गळती रोखता येत नाही.  

 केस गळती रोखण्यासाठी रक्त तपासणी करावी. त्याद्वारे शरीरातील संप्रेरकांचे (हार्मोन) असंतुलन किंवा लोह कमतरता तपासून, त्यावर उपाय केल्यास केसगळतीचे मूळ कारण संपवता येते. पौष्टिक आहार, ताजी फळे-भाजीपाल्याच्या नियमित सेवनाने केसांना फायदा होतो. नियमित व्यायाम व तणावमुक्तीनेही लाभ होतो, असा सल्ला तज्ज्ञ देतात. वैद्यकीय सल्ल्याने ‘पेप्टाईड सिरम’ दोनदा केसांना लावावे. ‘मिनॉटक्सिडिल’ लोशन केसांना लावल्याने केस विरळ होण्याचे प्रमाण कमी होते, तज्ज्ञ सांगतात.