नवी दिल्ली : करोना होऊन गेल्यानंतरही कोविडपश्चात आरोग्याचे प्रश्न रुग्णांना दीर्घ काळ सतावतात. केवळ श्वसनसंस्थाच नाही, तर पचनक्षमता व हृदयाच्या कार्यावरही करोनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. करोनातून बऱ्या झालेल्या स्त्रियांना काही त्रासांना सामोरे जावे लागते. अनियमित मासिक पाळी, रक्ताच्या गुठळय़ा होणे, मानसिक अस्वस्थता व मासिक पाळी येण्याआधीच्या त्रासात वाढ होते, असा त्रास काही महिलांना होतो.  

 करोनामुळे संप्रेरकांचे असंतुलन होते. करोनाचा स्त्रियांमधील ‘हायपोथॅल्मिक पिटय़ुटरी ओव्हरियन एंडोमेट्रल अ‍ॅक्सिस’ या प्रजननक्षमता नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. स्त्री बीजांडकोशात पुनरुत्पादनासंबंधीची संप्रेरके निर्माण होणे मंदावते अथवा थांबते. त्यामुळे मासिक पाळीविषयी गुंतागुंत वाढते. काही जणींत मासिक पाळी बंद होणे अथवा काही रुग्णांत काही आठवडय़ांच्या अंतरानेच मासिक पाळी येते. ज्या स्त्रियांना करोनाची दीर्घकाळ म्हणजे दोन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ बाधा झाली आहे, अशांना हा त्रास विशेषत: जाणवतो. या अनियमिततेमुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ज्या स्त्रियांना करोनाचा दीर्घ काळ संसर्ग होतो त्यांना रक्ताभिसरण अथवा पचनासंबंधी त्रास होतो, त्यांची मासिक पाळी अनियमित होण्याची जास्त शक्यता असते. दीर्घकाळ विलगीकरणाने ‘सेरोटोनिन’ व इतर संप्रेरकांवर परिणाम होऊन काही स्त्रियांच्या कामप्रेरणेवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे करोनातून बऱ्या झाल्यानंतर स्त्रियांनी या त्रासापासून दूर राहण्यासाठी काही उपाय करावेत, असे तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते करोनापश्चात काळात ध्यानधारणा, प्राणायाम, सजग जीवनपद्धती अवलंबावी. योगासने किंवा तायाची (मार्शल आर्ट) करावीत. हिरव्या पालेभाज्या, दूध, चीज, शेंगा, सुकामेव्यासारखा रक्तक्षय दूर करणारा लोह आणि कॅल्शियमयुक्त पौष्टिक आहार घ्यावा. चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकिलग रोज अर्धा तास नियमित करावे.