नवी दिल्ली : पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे काही ऋतुजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. डेंग्यू, मलेरिया, अतिसार आदी रोगांसाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात हवेत जिवाणूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात डोळय़ांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. 

याबाबत नेत्रतज्ज्ञ सांगतात, की जिवाणू-विषाणूंसाठी पावसाळी हवा चांगले माध्यम असते. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास हे विकार बळावण्याची शक्यता असते. डोळे हा शरीरातील सर्वात संवेदनशील आणि नाजूक अवयव असतो. त्यात संसर्गाची शक्यता अधिक असते. पावसाळी वातावरणामुळे नेत्रदाह-डोळे येणे, कॉर्नियल अल्सर आणि स्टाईज (पापण्यांवर मुरुमांसारखे घाव) आदी नेत्रविकारांची शक्यता असते.

पावसाळय़ात वादळी हवेमुळे डोळय़ांत धूळ-रेती जाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात डोळय़ांच्या संरक्षणासाठी गॉगल वापरावा. तुम्ही ‘काँटॅक्ट लेन्स’ वापरत असाल तर त्या योग्य पद्धतीने व नियमित साफ कराव्यात. तसे  न केल्यास दृष्टीस धोका उद्भवू शकतो. पावसाळय़ात ही जोखीम वाढते.

डोळय़ांतील ओलेपणा कायम राहण्यासाठीचे नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने नेत्रिबदू (लुब्रिकंट आयड्रॉप) वापरावेत.धूळ आणि दूषित पाण्यांपासून डोळय़ांचा बचाव करावा. टॉवेल व नॅपकिन स्वतंत्रपणे वापरावेत. नेत्रविकार हे संक्रमित होणारे असतात. त्यामुळे त्यासाठीची खबरदारी अवश्य घ्यावी. आपण वापरत असलेले रुमाल, नॅपकिन, टॉवेल इतरांपासून दूर ठेवावेत व स्वत:साठीच वापरावेत.

या काळात रस्त्यालगतचे, उघडय़ावर विकत मिळणारे मसालेदार अन्नपदार्थ खाण्याचा मोह टाळावा. त्यामुळे आरोग्याचे इतर प्रश्न तर निर्माण होतातच, शिवाय नेत्रविकारही होण्याची शक्यता असते. या काळात फलाहार, फळभाज्यांची सॅलेड, स्वच्छ केलेल्या हिरव्या पालेभाज्या व योग्यरीत्या पाण्याचे सेवन नियमित करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.