वॉशिंग्टन : करोना संसर्गानंतर काही महिन्यांनी मानसिक विकार वाढण्याचा धोका असतो, असा निष्कर्ष अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठाच्या एका अभ्यासानंतर काढण्यात आला. श्वसनसंस्था विकाराच्या इतर रुग्णांच्या तुलनेने २५ टक्के करोना रुग्णांमध्ये ते बरे झाल्यानंतरही साधारण चार महिन्यांत मानसिक विकार होण्याची जोखीम असते.

हे संशोधन ‘वल्र्ड सायकियाट्री’ या विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. कोविडपश्चात मानसिक विकारवाढीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना हा अभ्यास उपयोगी पडेल; परंतु पूर्वीच्या अभ्यासांतील निष्कर्षांच्या तुलनेत या नव्या अभ्यासात मानसिक विकारांची जोखीम वाढण्याचे प्रमाण कमी आढळले.  या अभ्यासात ४६ हजार ६१० करोना रुग्णांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

संशोधकांनी करोना रुग्णांचे निदान झाल्यानंतर २१ ते १२० दिवसांपर्यंतचा व निदानानंतर १२० ते ३६५ दिवसांपर्यंत ज्या रुग्णांना कोणतेही पूर्वी मानसिक विकार नव्हते, अशांचा अभ्यास केला. यात असे आढळले, की करोना झालेल्या व्यक्तींत मानसिक विकार होण्याचे प्रमाण ३.८ आहे. इतर श्वसनविकार झालेल्या रुग्णांत हे प्रमाण ३.० आहे. ०.८ टक्के फरकाने मानसिक विकार वाढण्याची जोखीम २५ टक्क्यांनी वाढते, असे संशोधक सांगतात. या विकारांमध्ये चिंताग्रस्ततेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामानाने भावावस्थेतील बदलांचे विकार (मूड डिसऑर्डर) वाढत नसल्याचे दिसले.

संशोधनानंतर करोना रुग्ण आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी या संदर्भात सजग राहण्याची गरज अधोरेखित होते. ज्या रुग्णांना करोना होऊन गेला आहे, त्यांना चिंताग्रस्तता सतावत असेल किंवा करोनानंतर मानसिक अवस्थेत काही बदल आढळत असल्यास त्वरित संबंधित तज्ज्ञांचा सल्ला व मदत घ्यावी.

वैद्यकीय तज्ज्ञांनीही रुग्णांची करोनापश्चात मानसिक स्थिती तपासत राहावी. त्यांच्याशी संवाद ठेवावा व नियमित तपासणी करावी. करोना होऊन गेलेल्या प्रत्येक रुग्णात ही समस्या उद्भवेल असे नाही; परंतु ती एक शक्यता असल्याने दुर्लक्षही करू नये, असा संशोधकांचा सल्ला आहे.