scorecardresearch

आरोग्यवार्ता : नैसर्गिक आहाराद्वारे ‘हिमोग्लोबिन’ वाढ शक्य

‘हिमोग्लोबिन’ हे लाल रक्तपेशींमधील लोहयुक्त प्रथिन आहे. जे शरीराच्या विविध अवयवांना आणि ऊतींना प्राणवायूचा पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आरोग्यवार्ता : नैसर्गिक आहाराद्वारे ‘हिमोग्लोबिन’ वाढ शक्य
नैसर्गिक आहाराद्वारे ‘हिमोग्लोबिन’ वाढ शक्य

नवी दिल्ली : ‘हिमोग्लोबिन’ हे लाल रक्तपेशींमधील लोहयुक्त प्रथिन आहे. जे शरीराच्या विविध अवयवांना आणि ऊतींना प्राणवायूचा पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. बहुसंख्य भारतीयांत ‘हिमोग्लोबिन’चे रक्तातील प्रमाण कमी असते. विशेषत: स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे लोहयुक्त आहार वाढवण्याचा सल्ला ‘हिमोग्लोबिन’ वाढीसाठी दिला जातो. ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण जास्त प्रमाणात घटल्याने रक्तक्षय होण्याची जोखीम असते. त्यामुळे लोहयुक्त आहाराद्वारे रक्तक्षय दूर ठेवून शारीरिक ऊर्जा वाढवता येते.

पुरुषांत १३.५ ते १७.५ ग्रॅम प्रति डिसिलिटर व स्त्रियांत १२ ते १५.५ ग्रॅम प्रति डिसिलिटर ‘हिमोग्लोबिन’ची सामान्य पातळी मानली जाते. जर आपले ‘हिमोग्लोबिन’ यापेक्षा कमी पातळीवर असेल, तर आपल्या आहारात खालील काही अन्नपदार्थाचे सेवन वाढवल्यास ही पातळी वाढू शकते.

लाल माठाची भाजी : लोहयुक्त असल्याने लाल रक्तपेशींच्या संख्येसह ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण वाढवतात.

खजूर : खजुरांमधील लोहयुक्त घटकांमुळे ‘हिमोग्लोबिन’ची पातळी वाढते. खजुरात लोह शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे असते, क जीवनसत्त्व, ब जीवनसत्त्व आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करू शकणारे फॉलिक आम्लही खजुरात असते. म्हणून खजूर खाल्ल्याने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढण्यास आणि अशक्तपणा टाळण्यास मदत होते.

मनुका : हे लोह आणि तांब्याचे समृद्ध स्रोत आहेत. त्यामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती आणि ‘हिमोग्लोबिन’ पातळी वाढवण्यासाठी मदत होते. तृणधान्य : तृणधान्यांचे (मिलेट्स) नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिन आणि ‘सीरम फेरीटिन’ची पातळी सुधारते. ज्यामुळे लोहाची कमतरता किंवा रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) घटण्यास मदत होते.

तीळ : तिळात लोह, फोलेट (ब ९ जीवनसत्त्व), फ्लेव्होनॉइड, तांबे आणि इतर पोषक घटक असतात. लोहाचा पूरक म्हणून ‘हिमोग्लोबिन’ची पातळी वाढविण्यात भूमिका बजावतात. त्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते जांभूळ, जर्दाळू, नाचणी, मसूर, चिंचेचा कोळ आणि शेंगदाण्यांमुळेही ‘हिमोग्लोबिन’ची पातळी वाढवण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news possible increase hemoglobin natural diet hemoglobin organs ysh

ताज्या बातम्या