scorecardresearch

आरोग्यवार्ता : योग्य उपचार, पथ्यांनी ‘सोरायसिस’ नियंत्रण शक्य

‘सोरायसिस’ हा एक त्वचाविकार आहे. तो दीर्घकाळ राहतो.  एक जुनाट विकार अशीही त्याची ओळख आहे.

आरोग्यवार्ता : योग्य उपचार, पथ्यांनी ‘सोरायसिस’ नियंत्रण शक्य
इंडियन एक्सप्रेस

नवी दिल्ली : ‘सोरायसिस’ हा एक त्वचाविकार आहे. तो दीर्घकाळ राहतो.  एक जुनाट विकार अशीही त्याची ओळख आहे. यात त्वचेवर पांढुरके-चंदेरी व लालसर चट्टे येतात. त्यात डोके नाभी, गुडघे, कोपर, तळव्यांवर, तळपायांवर या विकाराचा प्रादुर्भाव होतो. ‘सोरायसिस’ होण्यामागे अनेक कारणांची शक्यता असते. त्यात आनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकही त्याला कारणीभूत ठरतात. शरीर त्वचेच्या मृत पेशी टाकून नव्या पेशींची निर्मिती सातत्याने करत असते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ३९ ते ४२ दिवसांच्या नियमित खंडानंतर ही प्रक्रिया होत असते. मात्र ‘सोरायसिस’ झाल्यानंतर या प्रक्रियेत खंड पडतो. यात शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली त्वचेच्या पेशींच्या वाढीचा वेग वाढवतात. त्यामुळे त्यांचा एका वर एक असा स्तर निर्माण होतो. परिणामी लाल चट्टे त्वचेवर दिसू लागतात, असे त्वचारोग तज्ज्ञ सांगतात. कोरडय़ा हवामानात, मद्यपान, धूम्रपान, तणाव, लठ्ठपणा आणि काही औषधांमुळे ‘सोरायसिस’ वाढू शकतो. संधिवात, लठ्ठपणा, मधुमेह, मानसिक ताण, नैराश्य आणि या विकारामुळे येणारी कमीपणाची भावना अशी गुंतागुंतही ‘सोरायसिस’मुळे वाढते.

वस्त्रपरिधान करण्याच्या पर्यायांवर होणारा परिणाम, सार्वजनिक कार्यक्रमांतून, लोकांत मिसळण्याची लाज वाटणे, कामाच्या ठिकाणी न जावेसे वाटणे, लाजिरवाणेपणा वाटणे अशा परिणामांमुळे या विकाराचे मानसिक दुष्परिणामही मोठय़ा प्रमाणावर होतात. डॉक्टरांच्या मते, काही भागातील ‘सोरायसिस’ सहसा केवळ मलमांना प्रतिसाद देते. येथे असह्य खाज सुटते. तेथे खाजवल्याने आणखी स्थिती आणखी बिघडते. ‘कोबेनेरायझेशन’मुळे त्वचेवर त्वचेचे स्तर निर्माण होतात. तेथे खाजवल्याने नवीन जखम होतात व वेदनांची तीव्रता वाढते. या भागातील त्वचेची स्निग्धता वाढवणे (मॉइश्चरायिझग) जास्त लाभ होतो.

 ‘सोरायसिस’ग्रस्तांनी करावयाचे उपाय तज्ज्ञ सुचवतात, ते असे : ‘सोरायसिस’ग्रस्त भागावर खोबरेल तेलाने मसाज करावा. या तेलातील मेदाम्लांमुळे सूज, दाह कमी होतो. त्यातील त्वचेचे आरोग्य राखणारे घटक मदत करतात.

  •   कमी उष्मांक असलेले भोजन करावे. त्यात हिरव्या पालेभाज्या, फळांचा मुबलक समावेश असावा. त्यामुळे शरीरातील उतींमध्ये प्राणवायूच्या अभावाने येणारा ताण दूर होण्यास मदत होते.
  •   तणाव व्यवस्थापन करणे, त्यासाठी योगासने, प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम करणे गरजेचे आहे.
  •   त्वचेवर टॅटू, गोंदवणे, टोचणे-छेद करणे टाळावे.

तरीही ‘सोरायसिस’चा प्रादुर्भाव, गांभीर्यानुसार उपचारांचे वेगवेगळे तंत्र तज्ज्ञ अवलंबतात. त्यात मलमांपासून, औषधांपर्यंत तसेच किरणोपचारांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘सोरायसिस’ हा संसर्गजन्य विकार नसून, त्यावर नियमित उपचारांद्वारे तो फारशी गुंतागुंत न होता नियंत्रणात राहतो, असे तज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news psoriasis controlled proper treatment regimens skin disorders disorder ysh

ताज्या बातम्या