नवी दिल्ली : रात्री झोपेदरम्यान खोलीत अगदी मंद प्रकाश ठेवला तरी प्रौढांत स्थूलपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते, असे एका अभ्यासात निदर्शनास आले. अमेरिकेत शिकागोतील ‘नॉर्दवेस्टर्न युनिव्हर्सिटी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन’तर्फे करण्यात आलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. निद्रेदरम्यान खोलीत प्रकाश असल्यास निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांचे निरीक्षण करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

जाग येण्याआधी काही काळ आधी खंडित निद्रा असते.  त्या वेळी खोलीत अंधार असेल तर झोपेत अडथळे अथवा ती विचलित होणार नाही. निद्रेदरम्यान खोलीत प्रकाश असल्यास शरीरात झोपेच्या घडय़ाळावर परिणाम होऊन ते बिघडते. आपल्या शरीरातील जैविक यंत्रणा झोप येणे-जाग येण्याचे नियंत्रण करतेच, तसेच त्यामुळे झोपेचे प्रमाण आणि तिची गुणवत्ताही ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. जेव्हा शयनगृहात संपूर्ण अंधार असतो, त्या वेळी निद्रेदरम्यान शरीरात ‘मेलाटोनिन’ नावाचे संप्रेरक निर्माण होते. त्यामुळे फुप्फुस अथवा प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगासारख्या विकारांसह इतर रोग-विकारांना प्रतिबंध होतो. संपूर्ण अंधारामुळे शांत झोपही येते. त्यामुळे स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि नैराश्य येण्याची शक्यता कमी होते. अंधारातील झोपेने आपल्या डोळय़ांनाही व्यवस्थित आराम मिळतो व त्यांचे आरोग्य चांगले राहते. ज्यांना दिवा लावूनच झोपायची सवय असेल, त्यांनी झोपेच्या ठिकाणी किमान मंद प्रकाश ठेवावा. शक्यतो जमिनीच्या जवळ असलेल्या मंद प्रकाश देणाऱ्या दिव्यांनी (टेबल लॅम्प) झोप येण्यास मदत होते, असेही तज्ज्ञ सांगतात.