scorecardresearch

आरोग्यवार्ता : क्षयरोगाने स्त्रियांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम

क्षयरोगाची बाधा फक्त फुप्फुसांना होते, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु क्षयाची बाधा यकृत, अस्थी, मेंदू आणि जननेंद्रियांनाही होऊ शकते.

home-remedies-for-cough

क्षयरोगाची बाधा फक्त फुप्फुसांना होते, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु क्षयाची बाधा यकृत, अस्थी, मेंदू आणि जननेंद्रियांनाही होऊ शकते. १५ ते ४५ वर्षे वयोगटाच्या स्त्रियांना या आजाराची बाधा होऊन त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते क्षयरोगाच्या जंतूंची बाधा स्त्रीबीज वाहिन्यांना होते. त्यामुळे या वाहिन्या बंद होतात. गर्भाशय अस्तरालाही या आजाराच्या जंतूंची बाधा होऊन अस्तराची जाडी कमी होते. त्यामुळे नियमित मासिक पाळीवरही परिणाम होतो. परिणामी प्रजननक्षमता थांबते. क्षयरोगामुळे अंडाशय, गर्भाशय ग्रीवा आणि योनीवरही दुष्परिणाम होतात. क्षयरोगाची बाधा संसर्गजन्य असते. त्याचे जंतू रुग्णाच्या शिंक-खोकल्यावाटे वातावरणात पसरतात. त्यातून दुसऱ्याला बाधा होते. रोगप्रतिकारक क्षमता क्षीण असलेल्यांच्या शरीरात ‘क्टिव्ह टीबी ए टाइप’ या प्रकारच्या क्षयरोग जंतूंचा प्रादुर्भाव होताच त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून ते विविध अवयवांना बाधित करू लागतात. ‘मिलिरी टय़ुबरक्युलॉसिस’चे जंतू फुप्फुसांना बाधा पोहोचवतात. त्यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका पोहोचू शकतो.

स्त्रियांच्या जननेंद्रियांच्या क्षयामुळे मासिक पाळीच्या विविध समस्या, ओटीपोटात वेदना आणि योनिस्राव, अशी लक्षणे आढळतात. त्याचे निदान मासिक पाळीची रक्ततपासणी, गर्भाशयाची ‘बायोप्सी’ केली जाते. गर्भवती महिलांना क्षयाची बाधा झाल्यास गर्भपात, गर्भाशय संकोचणे, मुदतपूर्व प्रसूती, अर्भकाचे कमी वजन आणि नवजात अर्भकाच्या मृत्यूचा धोका संभवतो. गर्भाशयाच्या क्षयात इतर लक्षणे नसली तरी मासिक पाळी न येणे किंवा अनियमितता अशा तक्रारी असतात. त्यामुळे अशा प्रकारची समस्या किंवा क्षयाची इतर लक्षणे वाटल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निदान करावे. जर लवकर निदान झाले तर उपचार होतात. ते दीर्घकाळ चालतात.

क्षयरोगापासून दूर राहण्यासाठी समतोल आहार, स्वत:ची निगा व स्वच्छता पाळणे व सार्वजनिक ठिकाणी पुरेशी दक्षता घेणे गरजेचे आहे. क्षयरुग्णांनी तो बरा झाल्यानंतरही ही काळजी घ्यावी. पुरेसा आराम, हवेशीर खोलीत वास्तव्य, नियमित पाणी पिणे, वैद्यकीय उपचार खंडित न करता नियमित सल्ला घ्यावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health news tuberculosis affects women fertility ysh

ताज्या बातम्या