नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) दोन संस्थांनी क्षयरुग्णांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जीवनमानाच्या केलेल्या अभ्यासानुसार सामान्य व्यक्तींच्या तुलनेत क्षयरुग्णांचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही मृत्यूचे प्रमाणे दोन ते चार पटीने अधिक आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

देशातील विद्यमान क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमानुसार २०२५ पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार देशभरातील क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. क्षयरुग्णांच्या निकटच्या सहवासात येणाऱ्या आप्तांना संसर्ग होऊ नयेत म्हणून शंभर वर्षे जुनी बॅसिलस कॅल्मेट-गुएरिन (बीसीजी) लस किंवा त्यातील नवीन प्रकारांच्या लशींच्या चाचण्याही घेण्यात येत आहेत.

चेन्नईच्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेने थिरुवल्लुर जिल्ह्यात केलेल्या संशोधनात १२ हजार २४३ इतर सर्वसाधारण व्यक्तींच्या तुलनेत चार हजार २२ उपचार झालेल्या क्षयरुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २. ३ पटींनी जास्त असल्याचे निष्कर्ष निघाला आहे. धूम्रपान करणाऱ्या क्षयरुग्णांत मृत्युमुखी पडण्याची जोखीम २.६ टक्क्यांनी जास्त आहे. सर्वसाधारण व्यक्तिसमूहाच्या तुलनेत उपचार मिळालेल्या सर्व वयोगटातील क्षयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. वयानुसार ही जोखीम वाढते, असेही हे संशोधन स्पष्ट झाले आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील क्षयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वसाधारण व्यक्तींच्या तुलनेत ४.६ टक्क्यांनी जास्त आहे.

दुसरा अभ्यास जबलपूरच्या राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन संस्थेने केला. सहारिया आदिवासी जमातीतील नऊ हजार ७५६ जणांचा अभ्यास केला गेला. त्यानुसार सर्वसाधारण व्यक्तीसमूहापेक्षा क्षयरोगाने बाधित व्यक्तिसमूहातील मृत्यूचे प्रमाण चार पटीने जास्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. क्षयरोगाच्या उपचार झालेल्या एक हजार रुग्णांपैकी १२२.९ मृत्यू झाले. तर सर्वसाधारण व्यक्तिसमूहातील ३०.३ मृत्यू झाले. यामागे अपूर्ण अथवा चुकीचे उपचारही कारणीभूत ठरल्याचे दिसले. थेट निरीक्षण उपचार (डॉट) न घेणाऱ्या रुग्णांतील मृत्यूचे प्रमाण ६६ टक्के होते.

संसर्गानंतरही नियमित उपचारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुग्णांचे मृत्यू प्रमाण ६५.६ टक्के होते. ज्यांनी उपचारच सोडून दिले अशा रुग्णांत ६२.५ टक्के मृत्यूचे प्रमाण होते. जे रुग्ण बरे झाले त्यांच्यात हे प्रमाण ३२.७ टक्के होते. क्षयरुग्णांत लवकरात लवकर निदान झाल्यास हा रोग संपूर्ण बरा होण्याची शक्यता चांगली असते. त्यासाठी मद्यपान, धूम्रपानापासून दूर राहण्याची नितांत आवश्यकता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.