नवी दिल्ली : जेवणानंतर केलेल्या शतपावलीने रक्तशर्करा कमी होण्यास मदत होते, असे एका अभ्यासादरम्यान निदर्शनास आले. एरवी  जेवणानंतर चांगले पचन होण्यासाठी शतपावलीचा उपयोग होतो, अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, आता संशोधकांच्या निदर्शनास आले आहे, की कोणत्याही जेवणानंतर थोडे चालल्यानंतर रक्तशर्करेचा स्तर घटतो. त्यामुळे ‘टाईप २’ स्तराचा मधुमेहाने होणारे त्रास कमी होण्यास मदत होते. जेवल्यानंतर तासभर चालल्याचा अधिक लाभ होतो. त्यामुळे या काळात रक्तशर्करा वाढण्याची जास्त झालेली शक्यता कमी होते.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘जर्नल स्पोर्ट्स मेडिसिन’च्या अहवालात बसण्याचे, उभे राहण्याचे आणि चालण्याचे हृदयासह ‘इन्शुलिन’, रक्तशर्करेचा स्तर आदींवर होणाऱ्या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यात असे निदर्शनास आले, की जेवल्यानंतर थोडे चालणे दोन ते पाच मिनिटांपर्यंत वाढवत नेल्यास रक्तशर्करा पातळी नियंत्रित होण्यास लक्षणीय मदत होते. भारतीयांना याचे निष्कर्ष फायदेशीर ठरतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण भारतीयांची जेवणाच्या सवयी व आहार घटक पाहता जेवणानंतर रक्तशर्करा मोठय़ा प्रमाणावर वाढून, त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. मात्र, ज्या व्यक्तींना हृदयविकार आहे त्यांनी जेवणानंतर चालण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्याने घ्यावा. कारण त्यामुळे हृदयावरील ताण वाढण्याची शक्यता असते. याआधी २०११ व २०१६ मध्ये या संदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांना नव्या संशोधनामुळे दुजोरा मिळतो.

या अहवालात घरकामे करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे होणाऱ्या शारीरिक हालचालींसह दिवसभरात शक्यतो इतर हालचाली कराव्यात. या अल्प शारीरिक क्रियांमुळे व आहारातील योग्य बदलाने रक्तशर्करेचा स्तर नियंत्रित करण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी जास्त वेळ बसावे लागत असेल, त्यांनी असे जेवणानंतर थोडे चालत राहावे. त्यामुळे जिममध्ये ‘ट्रेडमिल’वर कठोर मेहनत घेऊन धावण्याच्या तुलनेत हा दोन-पाच मिनिटांचा ‘मिनी-वॉक’ अधिक व्यावहारिक आहे, असे या नव्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो.