नवी दिल्ली : वजन वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या व्याधींची शक्यता अधिक असते. तसेच चयापचय क्रियाही मंदावते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. परंतु एका नव्या संशोधनामुळे लठ्ठ व्यक्तींना दिलासा मिळणार आहे.
‘अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल’मध्ये प्रकाशित या संशोधनात सहभागी असलेल्या वैज्ञानिकांनी सांगितले की, लठ्ठ व्यक्तींना कोलेस्ट्रेरॉल आणि उच्च रक्तदाबाचा धोका असतो. ही दोन्ही कारणे हृदयरोगाची शक्यता वाढवते.
‘अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल’च्या २०२३ मध्ये प्रकाशित माहितीनुसार २०२० मध्ये लठ्ठपणामुळे २४ लाखपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
संशोधन काय?
या संशोधनाचे सहलेखक डॉ. सुसान ए. जेब यांनी सांगितले की, काही डॉक्टर आणि रुग्णांच्या म्हणण्यानुसार वजन कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढते. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठीचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. त्यांचा हा समज वजन कमी करण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींच्या मार्गात बाधा ठरतो.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार एकादा वजन कमी केल्यानंतर त्याचा लाभ पुढील पाच वर्षांपर्यंत मिळतो. अनेक व्याधींपासूनही अशा व्यक्ती दूर राहतात.