scorecardresearch

तुम्हाला सतत भूक लागतेय का? असू शकतात ‘ही’ कारणे

पोटभर खाल्यानंतरही जर तुम्हाला थोड्या वेळाने भूक लागत असेल, तर त्याचं योग्य कारण जाणून घेणं आवश्यक आहे.

health nutrition reasons of your hunger
शरीराला ऊर्जेची आवश्यकता असल्यास आपल्याला भूक लागते.(फोटो: PIXABAY)

शरीराला ऊर्जेची आवश्यकता असल्यास आपल्याला भूक लागते. भूक लागणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु तुम्हाला सारखंच काही खावंसं वाटत असेल तर तुमच्या आहारात काही पदार्थांचं प्रमाण कमी-जास्त झालेलं असू शकतं. पोटभर खाल्यानंतरही जर तुम्हाला थोड्या वेळाने भूक लागत असेल, तर त्याचं योग्य कारण जाणून घेणं आवश्यक आहे. सारखी भूक लागण्यामागे कोणती कारणे आहेत, जाणून घेऊया.

१. योग्य प्रमाणात प्रोटीन न घेणे

आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे आवश्यक आहे. शरीरात प्रोटीनचं प्रमाण कमी असल्यास सारखी भूक लागू शकते. चिकन, मटण, मासे आणि अंडी या पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात आढळून येते.

२. अपुरी झोप

सुदृढ शरीरासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे भुकेचे संकेत देणाऱ्या घ्रेलिन हार्मोनचं शरीरात प्रमाण वाढून सारखी भूक लागते. म्हणूनच कमीत कमी ८ तास झोप घेणं आवश्यक आहे.

३. पाणी कमी पिणे

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. कमी पाणी प्यायल्यामुळे सारखी भूक लागते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी शक्य तितके जास्त पाणी प्या किंवा पाण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या भाज्या आणि फळांचं सेवन करा.

४.रिफाईंड कार्ब्स पदार्थांचं सेवन

रिफाईंड कार्ब्समध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं प्रमाण कमी असते. मैद्यापासून बनणाऱ्या पदार्थांमध्ये रिफाईंड कार्ब्सचे प्रमाण अधिक असते. फायबरचं प्रमाण कमी असल्यामुळे रिफाईंड कार्ब्स असणारे पदार्थ लवकर पचतात आणि त्यामुळेच भूकही लगेच लागते. या ऐवजी आहारात ओट्स, रताळे, काजू ,अळशी या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

५. खाण्यावर लक्ष नसणे

व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पटापट किंवा गडबडीत जेवण केल्यामुळे पोट भरलंय की नाही हे देखील आपल्याला कळत नाही. अभ्यानुसार, जेवताना खाण्याकडे लक्ष नसलेल्या लोकांना सारखी भूक लागते.

६. खूप जास्त व्यायाम करणे

व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. व्यायाम करायला लागणाऱ्या ऊर्जेमुळे सारखी भूक लागू शकते. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी आहारात फायबर, प्रोटीन आणि चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

७. दारूचे व्यसन करणे

अभ्यासानुसार दारूचे जास्त व्यसन केल्यामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्याऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. दारूचे व्यसन करणाऱ्या व्यक्ती जास्त मीठ आणि चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे सारखी भूक लागू शकते.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2021 at 11:05 IST