Health pumpkin seeds benefits: स्वयंपाकघरातील मसाले आणि भाज्यांमध्ये लपलेल्या लहान बियांना अनेकदा आरोग्याचा खजिना मानले जाते. भोपळ्याच्या बिया हा असाच एक स्रोत आहे. या लहान बियांमध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे दडलेले आहेत. त्या मॅग्नेशियम, झिंक व ओमेगा-३ सारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि झोप वाढवतात. या बिया पुरुष आणि स्त्रियांच्या अनेक आरोग्य समस्यांवरही वरदान आहेत. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधिका व टीव्ही व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीराचे आजारांपासून संरक्षण होते.

काही वर्षांपासून भोपळ्याच्या बियांच्या फायद्यांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. कारण- त्या प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स आणि हृदयासाठी आरोग्यदायी चरबीने समृद्ध आहेत. या लहान बिया, अगदी कमी प्रमाणात सेवन केल्यावरही, महत्त्वपूर्ण आरोग्य फायदे देतात. या बिया विशेषतः पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यातील झिंकचे प्रमाण पुरुषांमधील वंध्यत्वावर उपचार करण्यास मदत करते. प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीची (प्रोस्टेटिक हायपरप्लासिया) लक्षणे नियंत्रित करण्यासाठीदेखील या बिया प्रभावी आहेत. चला तर मग, भोपळ्याच्या बियांचे पौष्टिक मूल्य, त्या योग्य प्रकारे कशा खाव्यात, दररोज किती प्रमाणात सेवन करावे आणि कोणती महत्त्वाची खबरदारी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊया.

भोपळ्याच्या बियांचे फायदे

या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. ‘आर्काइव्हज ऑफ इंटर्नल मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मॅग्नेशियमचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि पक्षाघाताचा (स्ट्रोकचा) धोका १५% पर्यंत कमी होतो. भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमच्या सर्वोत्तम नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहेत, त्या धमन्यांना सैल करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. तसेच गुडघेदुखी असेल तर त्यावरही या बिया रामबाण उपाय आहेत.

या बियांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते

भोपळ्याच्या बियांमधील झिंकमुळे रोगप्रतिकारक पेशींचे कार्य सुधारते. दररोज मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शरीराचे आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे मेलाटोनिन तयार करण्यास मदत करू शकते. भोपळ्याच्या बिया एल-ट्रिप्टोफॅनचा नैसर्गिक स्रोत आहेत. शरीर या अमिनो ॲसिडचे रूपांतर सेरोटोनिन आणि नंतर मेलाटोनिनमध्ये (झोपेचे संप्रेरक) करते. झोपण्यापूर्वी मूठभर बिया खाल्ल्याने निद्रानाशात सुधारणा होऊ शकते.

या बिया प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात

पारंपरिकपणे पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठी हे फायदेशीर मानले जाते. ‘जर्नल ऑफ मेडिसिनल फूड’मधील एका अभ्यासानुसार, भोपळ्याच्या बियांचे तेल आणि त्याच्या बिया बीपीएच (सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया), म्हणजेच प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीची लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. भोपळ्याच्या बियांच्या तेलात असलेले फायटोस्टेरॉल्स प्रोस्टेटचे आरोग्य राखण्यास आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.

या बियांमुळे केसांची वाढ होते

झिंक आणि प्रोटीन केसांची मुळे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

पचनास मदत करते

भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले फायबर आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. दररोज मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने आतड्यातील चांगल्या जीवाणूंची वाढ होते आणि पचनसंस्था निरोगी राहते.

या बिया रक्तातील साखर नियंत्रित करतात

मॅग्नेशियम ग्लुकोजच्या चयापचयास मदत करू शकते. अनेक प्रयोगशाळा अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, भोपळ्याच्या बियांची पावडर किंवा बियांचे सेवन केल्याने टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांमधील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यातील उच्च मॅग्नेशियम प्रमाणामुळे शरीराची इन्सुलिनप्रती संवेदनशीलता वाढते.

या बियांमुळे सूज कमी होते

या बिया ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढण्यास मदत करतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅरोटीनॉइड्ससारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. संशोधनानुसार, संधिवात असलेल्या लोकांमध्ये सूज कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे तेल काही दाहशामक औषधांइतकेच प्रभावी ठरू शकते, पण दुष्परिणामांशिवाय.

भोपळ्याच्या बिया कशा खाव्यात?

  • कच्च्या बिया खा; त्यांमध्ये सर्वाधिक पोषक तत्त्वे टिकून राहतात; पण त्यांची चव सौम्य असते.
  • या बिया भाजून खाण्याचा आनंद घ्या. त्या अधिक स्वादिष्ट आणि कुरकुरीत लागतात. मंद आचेवर भाजल्याने त्यातील बहुतांश पौष्टिक मूल्ये टिकून राहतात.
  • ते स्मूदीमध्ये मिसळून सेवन करा.
  • या बिया सॅलडवर शिंपडून खा.
  • तुम्ही भोपळ्याच्या बियांची पावडर बनवून, ती दह्यात मिसळून खाऊ शकता.
  • तुम्ही या बिया ओटमिलमध्ये घालून खाऊ शकता.

कोणी या बिया टाळल्या पाहिजेत?

  • ज्या लोकांना बियांची अॅलर्जी आहे, त्यांनी त्या टाळाव्यात.
  • ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनीही या बिया खाणे टाळावे.
  • जे लोक कमी कॅलरीचा आहार घेत आहेत त्यांनी हे टाळावे, नाही तर त्यांचे वजन वाढू शकते.
  • ज्यांची पचनसंस्था खूप संवेदनशील आहे, त्यांनी या बिया खाणे टाळावे.
  • जे लोक खनिजे नियंत्रित करणारी औषधे घेत आहेत, त्यांनीदेखील या बिया खाणे टाळावे.
  • जर तुम्हाला कोणतीही वैद्यकीय समस्या असेल, तर भोपळ्याच्या बियांचे सेवन वाढवण्यापूर्वी डॉक्टर किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.