How Much Sleep Needs By Age Group: नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, झोपेच्या वेळी आपला मेंदू स्वत:ला विषाक्त घटकांपासून शुद्ध करतो. जर तुम्ही तरूण असाल आणि सहा तासांपेक्षा कमी झोपलात तर तुम्हाला ताण, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका ४० टक्के वाढू शकतो. झोप ही आपल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री सात ते आठ तासांची झोप आपल्या मेंदूला रिस्टार्ट करते. झोपेच्या वेळी आपले शरीर स्वत:ला दुरूस्त करते आणि आपला मेंदू रिचार्ज होतो.
झोप का महत्त्वाची आहे?
- मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. कारण- ती शरीराला संसर्ग आणि जळजळ यांच्याशी लढणाऱ्या संरक्षणात्मक सायटोकिन्स, अँटीबॉडीज आणि टी-पेशी तयार करण्यास मदत करते.
- दीर्घकाळ झोपेचा अभाव विषाणूंकडे संवेदनशीलता वाढवतो आणि शरीराला रोगाचा धोका वाढवतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात जळजळ देखील होते.
- झोप ही शरीराची दुरूस्ती करण्याची पद्धत आहे. या काळात मेंदू पूर्णपणे बंद होत नाही. त्याऐवजी तो दिवसभराची माहिती प्रक्रिया करतो, महत्त्वाच्या आठवणी साठवतो आणि अनावश्यक माहिती काढून टाकतो.
- रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर मेंदू अधिक तीक्ष्ण, शांत आणि अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम होतो.
झोपेच्या कमतरतेचे तोटे
- जर तुम्ही रात्री ६ तासांपेक्षा कमी झोपलात तर त्याचा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर आणि मन:स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
- झोप पूर्ण झाली नाही तर मानसिक ताण आणि थकवा वाढतो.
- लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि मूड स्विंग, चिडचिडेपणा, चिंता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अनेकांना सतावतात झोपेच्या समस्या…
२०२६मध्ये ३ पैकी १ प्रौढ व्यक्ती ७ ते ९ तास पुरेशी झोप घेऊ शकणार नाही. डिजिटल ओव्हरलोड आणि मोबाईल फोनच्या अनियंत्रित वापरामुळे २०२६मध्ये निद्रानाशाच्या प्रकरणांमध्ये ४७ टक्के वाढ झाली आहे. २०२६मध्ये झोपेचा अभाव हे केवळ थकव्याचे कारण नाही तर जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून समोर येत आहे. २०२६च्या अलिकडच्याच संशोधनात आणि डेटानुसार, आपली वाईट जीवनशैली आपल्याला रात्रीची झोप हिरावून घेत आहे. जानेवारी २०२६मध्ये भोपाळमधील एम्सच्या एका नवीन संशोधनानुसार, झोपेचा अभाव आणि कॅन्सर यांच्यात परस्परसंबंध आढळून आला आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे शरीर कॅन्सरच्या पेशी आणि संसर्गांशी लढण्यास अपयशी ठरते.
अपुऱ्या झोपेचे आरोग्यावर होणारे परिणाम
भारतात ७० टक्के लोक दिवसातून ६ तासांपेक्षा कमी झोपतात आणि ३० टक्के लोक झोपेची गुणवत्ता खराब असल्याचे सांगतात. दिवसातून ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने केवळ थकवाच नाही तर लठ्ठपणा, ताण आणि हृदयरोग देखील होऊ शकतो.
गेल्या १५ वर्षांपासून डॉक्टर म्हणून काम करणारे आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनपासून झोपेचा अभाव २५ टक्क्यांनी वाढला आहे. अनिद्रा, कमी झोपेची स्थिती, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते. झोपेच्या कमतरतेमुळे दिवसा थकवा येतो, शारीरिक क्षमता कमी होते आणि शरीराचे कार्य बिघडते. जर निद्रानाशाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
तुम्ही किती वेळ झोपता? झोपेचा अभाव तुमच्या मूड आणि ऊर्जेवर परिणाम करतो हे तुमच्या लक्षात येतं का? वयानुसार निरोगी राहण्यासाठी तुम्हाला किती झोपेची आवश्यकता याबाबतचा हा चार्ट पहा…
| वयानुसार किती झोप गरजेची असते? | |
| वय | रोज किती झोप गरजेची? |
| ० ते ३ वर्ष | १४ ते १७ तास |
| ४ ते १२ वर्षे | ९ ते १२ तास |
| १३ ते १८ वर्षे | ८ ते १० तास |
| १८ ते ६४ वर्षे | ७ ते ९ तास |
| ६५ वर्षांपेक्षा जास्त | ७ ते ८ तास |
झोप कशी सुधारायची?
- दररोज ७ ते ८ तास झोपा
- झोपण्यापूर्वी मोबाईल आणि स्क्रीन टाइम कमी करा
- हलका व्यायाम आणि योगा करा
- कॅफिन आणि अल्कोहोलपासून दूर राहा
झोप ही फक्त विश्रांती नाही. चांगली झोप घेतल्याने तुमचे मन तीक्ष्ण होते, तुमचा मूड सुधारतो, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि तुमचे शरीर एकूणच निरोगी राहते.

