scorecardresearch

आरोग्यवार्ता : निद्रानाशामुळे डोळय़ांवर गंभीर परिणाम

निद्रानाशाचा डोळय़ांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दीर्घकालीन निद्रानाश विकारामुळे डोळय़ांच्या गंभीर समस्या निमार्ण होऊ शकतात.

night-sleep

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : मानवी शरीरासाठी झोप अत्यावश्यक आहे. व्यवस्थित झोप नसणे, सातत्याने झोपमोड होणे, गाढ झोप न लागणे, रात्रभर जागे राहणे आदी कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतातच, मात्र निद्रानाशामुळे डोळय़ांवरही गंभीर परिणाम होऊ शकतात, असे संशोधन अमेरिकी आणि चिनी वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतेचे केले. निद्रानाशामुळे डोळे कोरडे होणे, खाज सुटणे यांसारखे दुष्परिणाम होतात, असे या संशोधकांनी सांगितले.

निद्रानाशाचा डोळय़ांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दीर्घकालीन निद्रानाश विकारामुळे डोळय़ांच्या गंभीर समस्या निमार्ण होऊ शकतात. डोळय़ांच्या बाहुलीवर एक पारदर्शक पडदा असतो, त्यास कॉर्निया किंवा नेत्रपटल असे म्हणतात. नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. डोळय़ांचे कार्य आणि आरोग्य नेत्रपटलावर अवलंबून असते. मात्र निद्रानाशामुळे नेत्रपटलाला कोरडेपणा येतो आणि त्यामुळे डोळय़ांचे आजार सुरू होतात. निद्रानाश जर दीर्घकालीन असेल तर डोळय़ांवर गंभीर परिणाम होऊन दृष्टी अधू होण्याचाही धोका असतो, असे या संशोधकांनी सांगितले.

चीनमधील झामेन विद्यापीठातील वी लि, झुगौ लिऊ आणि अमेरिकेतील हार्वड वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी हे संशोधन केले आहे. ‘स्टीम सेल रिपोर्ट’ या नियतकालिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. झोपेची कमतरता भासत असेले तर नेत्रपटलातील पेशींवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे या संशोधकांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health serious effects on the eyes insomnia human body sleep essential ysh

ताज्या बातम्या