Wrong Food Combinations With Curd: दही हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम सुपरफूड मानले जाते. प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले दही केवळ शरीराला आतून थंडावा देत नाही, तर आपल्या पचनसंस्थेसाठीही एक वरदान आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की आयुर्वेदानुसार प्रत्येक भाजी दह्यासोबत खाणे योग्य नाही? आयुर्वेदानुसार, दह्यासोबत काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती मंदावते आणि शरीरात विषारी द्रव्ये साठू शकतात.
अनेकदा चवीच्या नादात आपण दह्यामध्ये अशा गोष्टी मिसळतो, ज्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ नित्यानंदम श्री यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, दह्यासोबत काही भाज्या खाणे आपल्या शरीरासाठी विषारी ठरू शकते. आयुर्वेदात दह्यासोबत काही भाज्या खाण्याला विरूद्ध आहार म्हटले जाते. त्यामुळे केवळ चयापचय क्रियाच बिघडत नाही, तर त्वचेचे आजार आणि तीव्र आम्लपित्त देखील होऊ शकते. तर मग जाणून घेऊया दह्यासोबत सेवन केल्यास कोणते पदार्थ आरोग्याच्या समस्या वाढवू शकतात.
दही आणि कांदा खरंच हानिकारक आहे का?
आय़ुर्वेदानुसार, कांदा उष्ण प्रकृतीचा आणि दही शीत प्रकृतीचे मानले जाते. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकते. आयुर्वेदानुसार, दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेची अॅलर्जी किंवा खाज येऊ शकते. पचनाच्या समस्या, कफ आणि विषारी द्रव्ये वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोनातून दही-कांदा रायता साधारण सुरक्षित मानला जातो. तेसुद्धा जर तुम्हाला अॅलर्जी नसेल तरच. दही एक प्रोबायोटिक आहे आणि कांदा एक प्रीबायोटिक आहे. संशोधनानुसार, प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक यांचे मिश्रण आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दही आणि काकडी, योग्य की अयोग्य?
काकडी रायता हा एक सामान्य भारतीय आहार आहे. आयुर्वेदात याला काही वेळा विरूद्ध अन्न म्हटले जाते. कारण या दोन्हींचा प्रभाव थंड असतो. आयुर्वेदानुसार, दही आणि काकडीचे सेवन केल्याने पचनक्रिया मंदावते. ते एकत्र खाल्ल्याने कफ वाढतो. तसंच आधुनिक पोषणशास्त्रानुसार, दही आणि काकडी हे दोन्ही शरीराला आर्द्रता देणारे आणि थंड करणारे पदार्थ आहेत. तसंच सर्वसामान्य व्यक्तीसाठी हे एक सुरक्षित मिश्रण आहे.
दही आणि भेंडी
काही समजुतींनुसार दही आणि भेंडी एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. दह्यासोबत भेंडी खाल्ल्याने गॅस आणि पट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. हे दोन्ही पदार्थ एकत्र दह्यासोबत आतड्यांसंबंधी अस्वस्थता वाढू शकते. मात् हे सिद्ध करणारा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही.
आयुर्वेदात कारले आणि दही यांचे गुणधर्म परस्परविरोधी मानले जातात. त्यांचे एकत्र सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ यांचा बॅलन्स बिघडतो. या पदार्थांच्या मिश्रणामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात.
तज्ज्ञ काय सांगतात?
जर तुम्ही दह्याचा रायता किंवा कोशिंबीर बनवत असाल तर आयुर्वेदानुसार त्यात भाजलेले जिरे, काळे मीठ आणि पुदिना नक्की घाला. हे घटक दह्याचा जडपणा संतुलित करतात आणि पचनक्रिया सुलभ करतात.
