Health Tips on Late Dinner Timing and Circadian Rhythm: रात्रीचे जेवण लवकर करणे पचन आणि आरोग्यासाठी उत्तम असते असे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, कामाचे वाढते तास, प्रवासाचा थकवा आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांसाठी लवकर जेवणे अशक्य वाटते. अशा परिस्थितीत, जेवणाची एक ठराविक वेळ असणे गरजेचे आहे की वेळेतील सातत्य जास्त महत्त्वाचे? यावर अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पलानियप्पन मणिक्कम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
काय आहे शरीराचे ‘मास्टर क्लॉक’?
तज्ज्ञांच्या मते, जैविक दृष्टिकोनातून संध्याकाळी ६ वाजता जेवणे आदर्श असले, तरी आपल्या शरीराच्या अंतर्गत घड्याळाशी (Circadian Rhythm) सुसंगत राहून सातत्य राखणे अधिक महत्त्वाचे आहे.
सर्कॅडियन रिदम: हे शरीरातील २४ तासांचे चक्र आहे जे आपल्याला कधी भूक लागावी, कधी झोप यावी आणि आपला उत्साह कसा असावा हे ठरवते.
आकार: हे ‘मास्टर क्लॉक’ मेंदूच्या समोरील भागात असते, ज्याचा आकार तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान असतो.
हार्मोनल नियंत्रण: शरीरातील हार्मोन्स या घड्याळानुसारच सक्रिय होतात आणि शांत होतात.
पचन आणि शरीराची दुरुस्ती (Repair Mechanism)
डॉक्टरांनी स्पष्ट केले की, पचनासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स सूर्योदयाच्या वेळी सक्रिय होतात आणि सूर्यास्तानंतर मंदावतात. याउलट, शरीराची झीज भरून काढणारे ‘ग्रोथ हार्मोन्स’ रात्री आपण झोपल्यानंतर मध्यरात्री उच्च पातळीवर असतात. त्यामुळे जेवण आणि झोपेची वेळ पाळणे शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ठरते.
“महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वेळापत्रकात सातत्य असणे. जर तुम्ही रात्री ९ वाजता जेवून ११:३० ला झोपत असाल, तर ते रोज त्याच वेळी पाळणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते”, असे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी लगेच जेवल्याने पचनसंस्था सक्रिय राहते, त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स, पोट फुगणे आणि झोपेत अडथळे येऊ शकतात. लवकर जेवल्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य कसे जपावे?
ज्यांना लवकर जेवणे शक्य नाही, त्यांच्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स देतात.
- झोप आणि जेवणात अंतर: जेवण आणि झोप यामध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर ठेवावे.
- हलका आहार: जर रात्री उशिरा जेवणार असाल, तर जेवण हलके आणि पचायला सोपे असावे. आहारात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण योग्य असावे.
- काय टाळावे?: रात्री उशिरा जास्त तेलकट, तिखट किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे, त्यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही.
- नित्यक्रम: दररोज जेवणाची आणि झोपण्याची वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शरीराला त्या चक्राची सवय होईल.
थोडक्यात सांगायचे तर, तुम्ही किती वाजता जेवता यापेक्षा तुम्ही रोज त्याच वेळी जेवता का आणि तुमच्या जेवणात व झोपेत पुरेसे अंतर आहे का, हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
