Black Salt On Watermelon : उन्हाळा सुरू होताच कलिंगड सर्वचजण आवडीने खातात. थंड, गोड, रसरशीत असे हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मात्र अनेक लोक त्याची चव वाढवण्यासाठी त्यावर मीठ टाकून खातात. पण ही सवयीचा तुमच्या आरोग्यावर कितपत योग्य आहे याचा कधी विचार केलात का? मीठ पचनासाठी उपयुक्त मानले जात असले तरी त्याच्या अतिसेवनामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः दररोज किंवा मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास शरीरास ते हानीकारक ठरू शकते. त्यामुळे, कलिंगडावर मीठ टाकून खाणे सुरक्षित आहे का समजून घेऊ…
कलिंगडावर मीठ टाकून खाण्याचे फायदे
१) पचनास मदत करते
मिठातील खनिजे पचनसंस्थेला सक्रिय करण्यास मदत करतात. कलिंगडासह मीठ खाल्ल्यास पोटातील गॅस कमी होऊ शकतो. बऱ्याच लोकांना फळे खाल्ल्यानंतर पोट जड झाल्यासारखे वाटते, त्यामुळे चिमूटभर मीठ खाल्ल्याने आराम मिळू शकतो. पण हा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या पचनक्षमतेवर अवलंबून असतो.
२) इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते
उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. कलिंगडामध्ये पाणी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, तर मिठातून अल्प प्रमाणात सोडियम मिळते. या दोन्हींचे संतुलित सेवन केल्यास डिहायड्रेशन टाळण्यास मदत होऊ शकते, विशेषतः जेव्हा तुम्ही जास्त वेळ उन्हात किंवा उष्ण वातावरणात असता तेव्हा हे फायदेशीर ठरते.
कलिंगडावर मीठ टाकून खाण्याचे तोटे
१) सोडियमचे प्रमाण जास्त
मिठामध्ये सोडियम असते. त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील सोडियमची पातळी वाढू शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. असे कलिंगड खाल्ल्याने सूज देखील येऊ शकते, ज्यामुळे हृदय आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो.
२) मूत्रपिंडांवर होणारा परिणाम
जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच किडनीचा त्रास किंवा उच्च रक्तदाब असेल, तर अतिरिक्त मीठ सेवनाने ही स्थिती आणखी बिघडू शकते. शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकणे हे किडनीचे काम आहे, परंतु अतिरिक्त मीठ सेवनाने या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ अशा सवयींमुळे किडनीचे कार्य कमकुवत होऊ शकते.
कलिंगडाचे नैसर्गिक फायदे
कलिंगड नैसर्गिकरित्या गोड, शरीराला पाणी देणारे आणि ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. मीठ घातल्याने त्याची नैसर्गिक चव बदलते. लोक अनेकदा त्यात जास्त मीठ घालतात, ज्यामुळे फळाचे पौष्टिक संतुलन बिघडू शकते. त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते कोणत्याही अतिरिक्त घटकांशिवाय खाणे उत्तम आहे.
कलिंगडवर मीठ टाकून खावे की नाही?
कलिंगडावर मीठ घालून खाणे पूर्णपणे चुकीचे नाही, पण त्याचे प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. संतुलन राखणे हाच आरोग्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
