Drinking Water on Empty Stomach: दिवसाची सुरूवात एक किंवा दोन ग्लास पाण्याने करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई होते. रात्री घाम आणि श्वासोच्छवासामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे सौम्य डिहायड्रेशन होते. यामुळे थकवा, सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.
जेक्विअर आणि कॉन्स्टंट २०१० यांच्या संशोधनानुसार, शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मन:स्थितीवर परिणाम होतो. सकाळी पाणी प्यायल्याने या समस्या कमी होऊ शकतात. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया वेगवान होऊ शकते. याला थर्मेजेनेसिस म्हणतात. यामुळे शरीर अधिक कॅलरीज बर्न करते.
आरोग्य हेल्थ सेंटरचे आयुर्वेदिक डॉ. एस. के. पांडे यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, दररोज सकाळी पाणी प्यायल्याने किडनीचे कार्य सुधारण्यास मदत होते. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केवळ पचनक्रियाच सुधारत नाही, वजन कमी करण्यास, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि दीर्घकाळ अवयवांचे आरोग्य राखण्यासही मदत होते. तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी टाळाव्यात…
रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे
रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आतड्यांमधून अन्न आणि टाकाऊ पदार्थ पुढे सरकण्यास मदत होते आणि किडनीला विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत मिळते. पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शौचास नियमित होते. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत होते आणि हेच डिहायड्रेशन, डोकेदुखी आणि थकवा यांचे प्रमुख कारण आहे. सकाळी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र काही लोकांसाठी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने समस्या वाढू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे कोणी टाळावे?
सकाळी उठल्यावर पाणी पिणे यामागे शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते आणि पचनक्रिया सुधारते अशी अनेक कारणे सांगितली जातात. असं असलं तरीही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही लोकांसाठी रिकाम्या पोटी पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. तेव्हा सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊ…
दीर्घकालीन किडनीचे विकार
दीर्घकालीन किडनीच्या आजारांसारख्या संबंधित समस्या असलेल्या लोकांनी किती आणि केव्हा पाणी प्यावे याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा रूग्णांनी केवळ त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पाणी प्यावे. कारण अतिरिक्त पाण्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो.
ह्रदयाशी संबंधित आजारांमध्ये
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने ह्रदयरोग असलेल्यांसाठी गुंतागुंत वाढू शकते. ह्रदयविकाराच्या रूग्णांनी झोपेतून उठल्याबरोबर मोठ्या प्रमाणात पाणी पिणे टाळावे. जास्त द्रवपदार्थ सेवन केल्याने ह्रदय आणि फुप्फुसांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, त्यामुळे स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.
पित्ताचा त्रास असल्यास
ज्या लोकांना अॅसिड रिफ्लुक्स किंवा गॅस्ट्रायटीससारखे पोटाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी जास्त पाणी पिणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ वाढू शकते. म्हणून अशा लोकांनी हळूहळू किंवा थोड्या थोड्या प्रमाणात पाणी प्यावे.
एडिमा म्हणजेच सूज आल्यास
ज्या लोकांना एडिमाचा त्रास आहे (एडिमा म्हणजे शरीराच्या ऊतींमध्ये (tissues) अतिरिक्त द्रव साचल्यामुळे येणारी सूज) त्यांनी संतुलित प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने सूज वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्यानुसार पाणी पिण्याचे प्रमाण ठरवले पाहिजे. तुम्हाला आरोग्याविषयी काही समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
