Fast Eating Habits: धावपळीच्या जीवनशैलीत आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. काम करताना तासनतास बसून राहणं आणि योग्य आहार या त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही पौष्टिक आहार जरी घेत असाल तरी तो कशा पद्धतीने सेवन करावा याबाबत जागरूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. अलिकडेच एका प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञांनी (Diabetologist) शेअर केलेली केस स्टडी सर्वांसाठी डोळे उघडणारी आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीत (MNC) वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला त्याच्या अतिशय जलद खाण्याच्या सवयीमुळे गंभीर ॲसिडिटीचा सामना करावा लागला.
नेमकी समस्या काय होती?
डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांनी फेसबुक पोस्टद्वारे या रुग्णाबद्दल माहिती दिली. हा रुग्ण गेल्या तीन वर्षांपासून ‘ॲसिड रिफ्लुक्स’ने त्रस्त होता. त्यांना सकाळी उठल्यावर छातीत जळजळ होणे आणि तोंडात आंबट चव येणे असा त्रास होत होता. एंडोस्कोपीमध्ये असे दिसून आले की, त्यांच्या अन्ननलिकेचे खालचे झडप (LES Valve) कमकुवत झाले आहे आणि त्यामुळे पोटातील आम्ल आणि अन्न पुन्हा घशाकडे येते.
हा व्यक्ती दिवसाला ३० मिनिटे चालणे, योगासने आणि पोहणे असा नियमित व्यायाम करत होता. आहारातही अनेकदा घरचेच जेवण असायचे. मात्र खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे याचा काहीच उपयोग झाला नाही.
‘४ मिनिटांत नाश्ता’- सवयीने बिघडवले आरोग्य
डॉ. मुखर्जी यांनी जेव्हा सखोल चौकशी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. हा रुग्ण तणावाखाली होता आणि जेवतानाही सतत फोनमध्ये व्यस्त असे. तो नाश्ता फक्त ४ मिनिटांत आणि तेही अनेकदा गाडी चालवताना करत. दुपारचे जेवण कामाच्या गडबडीत (Working Lunch) ६ मिनिटांत आणि रात्रीचे जेवण १० मिनिटांपेक्षा कमी वेळात. औषधांचा डोस वाढवूनही त्यांना आराम मिळत नव्हता, उलट पोट फुगण्याचे प्रमाण वाढले होते.
उपचार आणि बदल
डॉक्टरांनी त्यांना औषधांऐवजी जीवनशैलीत काही छोटे पण महत्त्वाचे बदल करायला सांगितले:
१. जेवणाची वेळ: घरचे जेवण किमान १५ मिनिटे शांतपणे बसून, अन्न नीट चावून खाणे.
२. वेळेत शिस्त: दररोज एकाच निश्चित वेळी जेवणे.
३. रात्रीचे जेवण: रात्री १० ऐवजी संध्याकाळी ७ वाजता जेवणे.
४. झोपण्याची पद्धत: छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी डोक्याखाली उंच उशी घेणे.
या बदलांचा परिणाम असा झाला की, अवघ्या ९ दिवसांत त्यांची सर्व लक्षणे गायब झाली. त्यांची औषधे बंद करण्यात आली आणि पोटाच्या तक्रारी ९० टक्क्यांनी कमी झाल्या.
तज्ज्ञ काय म्हणतात?
ठाण्यामधील केआयएमएस (KIMS) हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मनीष डोडमणी यांनी याबाबत दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “पचन प्रकिया तोंडातूनच सुरू होते. जेव्हा आपण अन्न नीट चावून खात नाही, तेव्हा पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. वेगाने खाल्ल्यामुळे पोटात हवा जाते आणि पोट फुगते. तसंच पोटावर दाब पडल्याने ॲसिड उलट्या दिशेला म्हणजे अन्ननलिकेत ढकलले जाते.”
काय करावे?
- जेवणासाठी किमान १५ ते २० मिनिटे वेळ काढा.
- टीव्ही, फोन किंवा लॅपटॉप बघत जेवणे टाळा (Distracted eating).
- अन्न पूर्णपणे चावून खा.
- झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी रात्रीचे जेवण करा.
डॉ. मुखर्जी याबाबत सल्ला देतात की, “जीवनशैली हे सर्वात मोठे औषध आहे. नेहमी माहितीपूर्ण निर्णय घ्या, कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका. प्रत्येक आजारावर फक्त गोळी हाच उपाय नसतो.”
