व्हिटॅमिन बी१२ हे शरीरासाठी एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे, जे ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा लोकांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो तेव्हा ते अनेकदा व्हिटॅमिन बी१२ सप्लिमेंट्स घ्यायला सुरूवात करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की ते घेण्याची एक योग्य वेळ आणि पद्धत आहे? जर ते योग्य वेळी घेतले नाही, तर शरीर ते पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. जीवनशैली औषध, सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंधात्मक औषध आणि डिजिटल आरोग्य या क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉ. सोहैब इम्तियाज यांनी व्हेरीवेल हेल्थला दिलेल्या माहितीप्रमाणे, व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेमुळे विविध आरोग्य समस्या कशा उद्भवू शकतात, ही कमतरता दूर करण्यासाठी आहार आणि सप्लिमेंट्स कसे प्रभावी ठरू शकतात आणि ते घेण्याची योग्य वेळ तसंच पद्धत कोणती आहे…

व्हिटॅमिन बी१२ घेण्याची योग्य वेळ कोणती आहे?

निरोगी शरीर राखण्यासाठी व्हिटॅमिन बी१२ आवश्यक मानले जाते. लोक अनेकदा आपली गरज भागवण्यासाठी बी१२ सप्लिमेंट्स घेतात, मात्र ते घेण्याची योग्य वेळ किंवा पद्धत त्यांना अनेकदा माहीत नसते. त्यामुळे त्यांना त्याचे फायदे मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी१२ सकाळी घेणे सर्वोत्तम आहे, प्रामुख्याने जर तुम्ही ऊर्जा वाढवण्यासाठी ते घेत असाल.

जर तुम्ही बी१२ सप्लिमेंट घेत असाल, तर ते सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारपूर्वी घेणे अधिक प्रभावी मानले जाते. ते शरीराला अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते, त्यामुळे शरीर दिवसभर सक्रीय राहते. काही संशोधनानुसार, बी१२ सतर्कता वाढवू शकते आणि शरीराला बाह्य संकेतांप्रति अधिक संवेदनशील बनवू शकते. त्यामुळे संध्याकाळी उशिरा ते घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, बी१२च्या सेवनाने मेलाटोनिन (झोपेचे हार्मोन्स)चे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे रात्री ते घेतल्यास झोपेची गुणवत्ता बिघडू शकते.

Award Banner

बी१२च्या कमतरतेची लक्षणे

व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेमुळे थकवा, ओठ कोरडे पडणे, जीभ सुजणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, त्वचा फिकट पडणे आणि श्वास घेण्यात त्रास होणे यासारखी विविध लक्षणे दिसू शकतात. तसंच चक्कर येणे, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, हात आणि पायांना मुंग्या येणे किंवा बधिरता येणे आणि चालण्यास अडचण येणे यासारखी काही मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे देखील दिसू शकतात.

नेमकं काय करावं?

जर तुम्हाला बी१२च्या कमतरतेची लक्षणे जाणवत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्लड टेस्टद्वारे कमतरतेची खात्री होऊ शकते आणि आवश्यक असल्यास पूरक औषधे किंवा इंजेक्शन्स लिहून दिली जाऊ शकतात.

व्हिटॅमिन बी१२चे सेवन कसे करावे?

  • जर तुम्हाला बी१२चे शोषण शरीरात चांगले करायचे असेल तर त्याचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करा.
  • जर तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल, तर ते व्हटॅमिन सी सोबत घेऊ नका. संत्री आणि लिंबू यासारख्या फळांसोबत बी१२चे सेवन केल्याने त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.
  • अतिरिक्त मद्यपानामुळे बी१२चे शोषण कमी होते, त्यामुळे त्याचे सेवन टाळा.
  • जर तुम्ही बी१२ घेत असाल, तर काही विशिष्ट औषधे घेणे टाळा. मेटफॉर्मिन आणि पित्तावरील औषधे याचा प्रभाव कमी करू शकतात. औषधांमध्ये किमान ४ तासांचे अंतर ठेवा.

व्हिटॅमिन बी१२ची गरज कोणाला आहे?

व्हिटॅमिन बी१२ प्रामुख्याने मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यासारख्या प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळते.त्यामुळे शाकाहारी आणि वेगन लोकांमध्ये याची कमतरता अधिक प्रमाणात आढळते. ही कमतरता भरून काढण्यासाठी पूरक आहार किंवा व्हिटॅमिन बी१२ युक्त अन्नपदार्थ घेऊ शकतात.

वेळेवर आणि नियमित बी१२च्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळण्यास, मन सक्रिय ठेवण्यास आणि मज्जासंस्था मजबूत होण्यास मदत होते.