Never Wear New Clothes Without Washing: नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते लगेच घालून मिरवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मग ते आवडीचे आऊटफिट असोत किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी घेतलेला ड्रेस, तो कधी एकदा घालतोय असं आपल्याला होतं. पण आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो की, हे कपडे दिसतात तितके स्वच्छ नसतात. फॅक्टरीपासून ते दुकानापर्यंत हे कपडे अनेक प्रक्रियांतून आणि हातांतून जातात, ज्यामुळे त्यात रसायने आणि घाण असू शकते.

नवीन कपडे धुवूनच का वापरावेत?

कपडे तयार करताना त्यावर रंग, फिनिशिंग केमिकल्स आणि इतर प्रक्रिया केल्या जातात, जेणेकरून वाहतुकीदरम्यान किंवा डिस्प्लेमध्ये ते चांगले दिसावेत. हे केमिकल्स खरेदी केल्यानंतरही कपड्यांवर त तसेच राहतात. त्यामुळे पहिल्यांदा वापरण्यापूर्वी ते धुणे हा एक शहाणपणाचा निर्णय ठरतो.

याव्यतिरिक्त, कपडे अनेक ठिकाणांहून प्रवास करत दुकानात पोहोचतात. या काळात त्यावर धूळ, बॅक्टेरिया आणि इतर अशुद्धी जमा होऊ शकतात. दुकानातही अनेक लोक ते कपडे ‘ट्राय’ करून पाहतात, ज्यामुळे संसर्ग किंवा फंगस पसरण्याची शक्यता असते.

Award Banner

केमिकल्सचा त्वचेवर परिणाम

विविध अहवालांनुसार, कपड्यांना सुरकुत्या पडू नयेत यासाठी ‘फॉर्मल्डिहाइड’ सारख्या रसायनाचा वापर केला जातो. तसेच कपड्यांना कडकपणा आणि आकार देण्यासाठी ‘स्टार्च’ वापरले जाते. ही रसायने त्वचेला खाज, जळजळ किंवा ॲलर्जी निर्माण करू शकतात. विशेषतः संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकते.

केवळ स्वच्छतेसाठीच नाही, तर कपड्यांच्या फिटिंगसाठीही ते धुणे फायद्याचे असते. फॅक्टरीमध्ये कपडे ताणून तयार केले जातात. पहिल्या धुण्यानंतर ते त्यांच्या नैसर्गिक आकारात येतात आणि अधिक आरामदायक वाटतात.

तज्ज्ञ काय म्हणतात?

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरच्या त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सुसान मॅसिक यांच्या मते, त्यांच्याकडे अनेकदा असे रुग्ण येतात ज्यांना नवीन कपडे घातल्यानंतर त्वचेवर रिॲक्शन येते. विशेषतः शरीराचे असे भाग जिथे घर्षण जास्त होते म्हणजे काख, कंबर, मान आणि जांघेचा भाग. तिथे खाज आणि जळजळ होण्याची शक्यता अधिक असते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • अपवाद: जॅकेट किंवा असे कपडे जे थेट त्वचेच्या संपर्कात येत नाहीत, ते न धुता घालता येतात.
  • ड्राय क्लीन: ज्या कपड्यांवर ‘ओन्ली ड्राय क्लीन’ अशी सूचना असेल, ते घरी धुवून खराब करू नका.
  • गडद रंग: गडद रंगाचे कपडे (उदा. डेनिम जीन्स) पहिल्यांदा धुताना रंग सोडू शकतात, जो तुमच्या त्वचेला किंवा इतर कपड्यांना लागू शकतो.