Yoga For Digestion: आपण जे खातो ते आपल्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर आपल्या मनस्थिती आणि मानसिक स्थितीवर थेट परिणाम करते. योग्य आहार घेतल्याने ऊर्जा टिकून राहते, मानसिक स्थिती सुधारते आणि ताण कमी होतो. अन्नाचा आपल्या पचनसंस्थेवर सर्वात खोल परिणाम होतो. कारण पचनक्रिया खराब राहिल्याने शरीराला पोषक तत्वे योग्यरित्या शोषता येत नाही.

पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. फायबरमुळे आतडे स्वच्छ होतात, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. पालक, मेथी आणि मोहरी यासारख्या हिरव्या पालेभाज्या आणि पपई, सफरचंद, नाशपती आणि पेरू यासारखी फळे फायबरचे उत्तम स्त्रोत आहेत. हे केवळ पचनक्रिया सुधारत नाहीत तर शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील मिळवून देतात.

पचनासाठी पुरेशे पाणी पिणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पित्त यासारख्या समस्या वाढू शकतात. दरम्यान, तळलेले, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. म्हणून संतुलित आणि साधा आहार घेणे चांगले. ज्यांना अनेकदा पचनक्रिया बिघडण्याचा त्रास होतो त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष देणे आणि सोबतच काही योगासनांचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Award Banner

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही व्यक्तिमत्व डॉ. हंसा योगेंद्र यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, नियमित वेळी खाणे, अन्न पूर्णपणे चावणे आणि जास्त खाणे टाळणे यामुळे पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. ज्यांची पचनक्रिया खराब आहे ते जेवणापूर्वी काही योगासनांचा सराव करून त्यांचे पचन सहज राखू शकतात. काही योगासनांमुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि अन्नातील आवश्यक पोषक तत्वे शोषली जातात. शरीराला फायदा होण्यासाठी जेवणापूर्वी कोणते योगासन करावे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

गोमुखासन करा

जेवणापूर्वी सराव करण्यासाठी पहिले महत्त्वाचे आसन म्हणजे गोमुखासन. या आसनात दोन्ही पाय पुढे करून बसावे आणि नंतर दोन्ही पाय एक-एक करून वाकवून गुडघे एकमेकांवर आणण्याचा प्रयत्न करावा. वरच्या पायाच्या त्याच बाजूला असलेला हात वरून मागे आणला जातो आणि दुसऱ्या हाताने धरला जातो. सुमारे ३० सेकंद या स्थितीत राहतो. हे आसन पाठीचा कणा सरळ करते, छाती उघडते आणि फुप्फुसांचे कार्य सुधारते. हे आसन अंतर्गत अवयवांना सक्रिय करते आणि त्यांना पचनासाठी तयार करते.

प्रभावी योगासने

योगमुद्रा या आसनात एका हााने एका मनगटाला दुसऱ्या हाताच्या मागे धरून आरामात पायांच्या आडव्या स्थितीत बसा. पाठीचा कणा सरळ ठेवून, खोलवर श्वास घ्या आणि श्वास सोडताना हळूहळू पुढे वाका. या आसनात खांदे आणि हात आरामशीर असतात. काही सेकंद थांबल्यानंतर श्वास घ्या आणि मूळ स्थितीत परत या आणि थोडेसे वळण घ्या. हे आसन पोटाच्या अवयवांवर हलका दाब देते, त्यामुळे वायू, घट्टपणा आणि कडकपणा कमी होतो आणि पचनसंस्था सक्रिय होते.

जेवणापूर्वी हलके स्ट्रेचिंग आणि वाकण्याचा व्यायाम खूप फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या सर्व अवयवांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो. जेव्हा शरीर सैल आणि आरामशीर असते तेव्हा ते अन्न सहजपणे शोषण्यास अधिक तयार असते. जेव्हा आपण बसून किंवा उभे राहून वळतो तेव्हा रोटाच्या सर्व अवयवांवर म्हणजेच पोट, आतडे, लिव्हर आणि स्वादुपिंडावर हलका दाब दिला जातो. हा दाब जमा झालेला वायू बाहेर काढण्यास मदत करतो, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होते.

मकरासन, सुखासन आणि पद्मासन करा

जेवणापूर्वी २ ते ५ मिनिटे मकरासन, सुखासन किंवा पद्मासनात शांतपणे बसणे देखील अत्यंत फायदेशीर आहे. या आसनांमध्ये बसल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो. जेव्हा मन शांत असते तेव्हा माणूस हळूहळू आणि जाणीवपूर्वक जेवतो. जाणीवपूर्वक खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि पचनाच्या समस्या कमी होतात.

दरम्यान, जेवणापूर्वी केलेले योगासन शरीराला नैसर्गिकरित्या पचनासाठी तयार करतात. ही आसने पोटातील अवयवांना सक्रिय करतात, वायू आणि रक्तसंचय कमी करतात तसंच रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतात. यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि शरीराला अन्नातील पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषता येतात. याव्यतिरिक्त योगासनांमुळे मन शांत होते.