scorecardresearch

बिअर प्यायल्याने किडनी स्टोन ठीक होत असल्याचे भारतीयांचे मत; वाचा सर्व्हे काय सांगतो?

जास्त मद्यपान करणार्‍यांना किडनी स्टोन होण्याचा धोका वाढवू शकते.

1 in 3 indians believe that beer consumption helps treat kidney stones
बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बर होत असल्याचा ३ पैकी १ भारतीयाचा दावा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतात दिवसेंदिवस किडनी स्टोनची प्रकरणे वाढत आहेत. शरीरात किडनी स्टोन निर्माण होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. आपल्या शरीरात खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढल्यास शरीरात किडनी स्टोन तयार होऊ लागतात. आहाराच्या बदलत्या पद्धती, वाढते वजन, सप्लिमेंट प्रोटीनचे सेवन किंवा इतर काही आजारांमुळेही किडनी स्टोन होण्याचा धोका वाढत आहे. शरीरात जेव्हा किडनी स्टोन तयार होऊ लागतो तेव्हा मूत्राशयातील मार्गात अडथळा निर्माण होतो आणि परिणामी व्यवक्तीला लघवी करण्यास जळजळ, आग होणे आणि प्रचंड वेदना अशी अनेक लक्षणे जाणवतात. या आजारावर अनेक उपाय सांगितले जातात, मात्र बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बरा होत असल्याचा अनेक भारतीयांचा दावा आहे. भारतातील प्रत्येकी ३ व्यक्तीमागे १ व्यक्तीचे मत आहे की, बिअर प्यायल्याने किडनी स्टोन आजार बरा होतो. प्रिस्टिन या हेल्थ केअर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

या सर्वेक्षणात सुमारे १००० लोकांनी सहभाग घेतला होता. यावेळी असे दिसून आले की, ५० टक्के किडनी स्टोनचे रुग्ण उपचारांसाठी ६ महिन्यांपेक्षा जास्त किंवा २ वर्षांपर्यंत उशीर करतात.

भारतात किडनी स्टोन आजाराच्या तीव्रतेबाबत कोणतीही अधिकृत राष्ट्रीय आकडेवारी नाही. मात्र या सर्व्हेनुसार,भारतात किडनी स्टोनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये किडनीच्या आजारांसंदर्भातील ऑनलाईन अपॉइंटमेंटमध्ये १८० टक्के वाढ झाली आहे. या बहुतांश रुग्ण हे किडनी स्टोन आजाराच्या उपचारांसाठी आले होते. किडनी स्टोनसंदर्भात सल्ला देणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत ३ पट अधिक आहे.

किडनी स्टोन आजाराचा सर्वाधिक धोका मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना आहे. मात्र १४ टक्के लोकांनाच याबाबतची माहिती आहे. अर्ध्याहून अधिक लोकांना हे माहितचं नव्हते की, शरीरात किडनी स्टोन तयार होत आहे. तर केवळ ९ टक्के लोकांना माहित होतो की, किडनी स्टोनमुळे शरारीतील प्रथिने नष्ट होतात. तसेच ७ टक्के लोकांना हाडांचे आरोग्य राखण्यासाठी किडनी महत्वाची भूमिका बजावत असल्याचे ठावूक होते.

फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकांना कोणताही सल्ला न घेता आहारात प्रोटीन सप्लीमेंट्सचा समावेश केला आहे. याबाबत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, अर्ध्याहून अधिक लोकांच्या मते प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

या सर्व्हेक्षणात किडनीच्या आरोग्याविषयी नागरिकांमध्ये जागरुकतेचा अभाव दिसून येत आहे. तसेच ६८ टक्के लोकांचा विश्वास आहे की, किडनी स्टोन काढण्यासाठी शस्त्रक्रिया सुरक्षित आहे. परंतु ५० टक्के लोक यावरील उपचारांसाठी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ उशीर करतात. अद्याप अनेकांमध्ये किडनीसंबंधीत आजारांबाबत जागरुकता नाही. यात तरुणांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर निदान आणि उपचारांमुळे किडनीचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते, असं मत प्रिस्टिन केअर संस्थेचे संस्थापक डॉ. वैभव कपूर यांनी व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 09:52 IST