मुंबई : सुकन्या (नाव बदलले) ही १२ वर्षाची मुलगी सुमारे दीड महिन्यापासून जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटणे, भूक न लागणे आणि दररोज उलट्या होणे याबद्दल तक्रार करत होती. उलट्या सहसा जेवणानंतर लगेच होत असत आणि हळूहळू त्या वरचेवर होऊ लागल्या. मुलीचे वजन ३९ किलोग्रॅम होते आणि तिला यापूर्वी कोणताही गंभीर आजार, शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय समस्या नव्हती. तिचे लसीकरण आणि शारीरिक विकास तिच्या वयानुसार सामान्य होता. डॉक्टरांनी तपासले असता तिच्या पोटात ९० टक्क्यांहून अधिक जागा व्यापणारा केसांचा एक मोठा घट्ट गोळा (ट्रायकोबेझोअर) आढळला. रुग्णालयाच्या बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि बालरोग शस्त्रक्रिया पथकांनी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून हा केसांचा गोळा यशस्वीरीत्या काढला.
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजीचे डॉ. आदित्य कुलकर्णी यांना तपासणी दरम्यान पोटाच्या डाव्या वरच्या भागात एक गाठ जाणवली. रक्त तपासणीनंतर, सीटी स्कॅनमध्ये पोटाच्या पोकळीत ९० टक्क्यांहून अधिक पसरलेला एक मोठा गोळा दिसून आला. ज्यामुळे ट्रायकोबेझोअरची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी करण्यात आली. ज्यामध्ये श्लेष्माने (म्युकसने) झाकलेला आणि पोटापासून लहान आतड्याच्या सुरुवातीपर्यंत पसरलेला केसांचा एक मोठा गोळा (हेअरबॉल) आढळून आला.
सुरुवातीला जनरल ऍनेस्थेशिया देऊन एंडोस्कोपीद्वारे तो गोळा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचे लहान तुकडे काढण्यात आले परंतु केसांच्या गोळ्याचा मोठा आकार आणि घनता यामुळे तो पूर्णपणे काढण्यासाठी ही पद्धत सुरक्षित नव्हती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बालररोग शल्यचिकित्सक डॉ. रसिकलाल शाह यांच्या नेतृत्वाखालील बालरोग शस्त्रक्रिया टीमने त्याच शस्त्रक्रिया सत्रात ओपन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.
पोटाच्या वरच्या भागात छेद घेऊन पोट काळजीपूर्वक उघडण्यात आले आणि सुमारे १६ बाय १४ सेंटीमीटर आकाराचा जवळपास पोटाच्या आकाराचा केसांचा एक मोठा गोळा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोट आणि पोटाच्या भिंतीला काळजीपूर्वक टाके घालण्यात आले. काढलेला गोळा प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आला, जिथे तो केस, अन्नाचे कण आणि श्लेष्मा (म्युकस) यांनी बनलेला ‘ट्रायकोबेझोअर’ (केसांचा गोळा) असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यात कर्करोगाची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. एंडोस्कोपी आणि ओपन सर्जरी यांचा समावेश असलेली ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन तास चाललेल्या एकाच सत्रात पूर्ण झाली.
शस्त्रक्रियेनंतर त्या मुलीला बालरोग विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिसऱ्या दिवशी, तिला पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर हळूहळू मऊ आहार सुरू करण्यात आला. ती उलट्या न करता सामान्यपणे खाऊ लागली असून सात दिवसांनंतर आहाराच्या सूचनांसह तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. याबाबत डॉ. आदित्य कुलकर्णी म्हणाले, मानवी केस पचत नाहीत. बराच काळ गिळल्यावर ते पोटात साठतात आणि त्यांचा एक घट्ट गोळा तयार होतो. या प्रकरणात, ट्रायकोबेझोअर्स बहुधा ३ ते ४ वर्षांत हळूहळू विकसित झाले असावेत. मुलांमध्ये सतत पोट भरल्यासारखे वाटणे आणि वारंवार उलट्या होणे याकडे कधीही दुर्लक्ष करू नये असे त्यांनी सांगितले.डॉ. रसिकलाल शाह म्हणाले, मोठे ट्रायकोबेझोअर्स एंडोस्कोपीने काढणे कठीण असते आणि त्यासाठी ओपन सर्जरीची आवश्यकता असते. विविध तज्ञांशी समन्वय साधून आम्ही एकाच सत्रात हा गोळा सुरक्षितपणे काढू शकलो आणि रुग्णाची प्रकृती सुरळीत सुधारेल याची खात्री केली.
यामागील मूळ कारण समजून घेण्यासाठी रुग्णालयाच्या बाल मानसोपचार तज्ञांच्या टीमनेही त्या मुलीची तपासणी केली. ट्रायकोबेझोअर्स अनेकदा ट्रायकोटिलोमेनिया आणि ट्रायकोफॅजिया यांसारख्या स्थितींशी संबंधित असतात, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःचे केस उपटून खाते. हे वर्तन अनेकदा मानसिक ताण, चिंता किंवा भावनिक त्रासाशी संबंधित असते आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये ते बराच काळ लक्षात येत नाही. भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळेवर केलेले मानसिक उपचार, वर्तणूक थेरपी आणि भावनिक आधार यांच्या महत्त्वाविषयी टीमने कुटुंबाला समुपदेशन केले.
