मुंबई : भारतातील डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव आता केवळ रुग्णसंख्येपुरता मर्यादित राहिलेला नाही. देशात डेंग्यूचे चारही विषाणू प्रकार (डिइएनव्ही-१,२,३,४) एकाच वेळी फिरत असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले असून, त्यामुळे संसर्गाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे आणि गंभीर बनल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. एका व्यक्तीला आयुष्यात दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वेगळ्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्यास गंभीर डेंग्यू, रक्तस्राव आणि मृत्यूचाही धोका वाढू शकतो, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या देशव्यापी अभ्यासात २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील हजारो नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून देशातील बहुतांश भागांमध्ये एकाच वेळी दोन किंवा अधिक डेंग्यू विषाणू प्रकार सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. काही राज्यांमध्ये तर चारही प्रकारांचा एकत्रित प्रसार होत असल्याचे आढळले. या निष्कर्षामुळे भारतातील डेंग्यू नियंत्रणाच्या धोरणात बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

डेंग्यूचे चारही प्रकार वेगवेगळे असले तरी एका प्रकाराचा संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण मिळत नाही. उलट, पहिल्या संसर्गामुळे शरीरात तयार झालेले प्रतिपिंड दुसऱ्या विषाणूचा संसर्ग अधिक तीव्र करण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे दुसऱ्यांदा होणारा डेंग्यू अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला ‘अँटिबॉडी-डिपेंडंट एन्हान्समेंट’ म्हटले जाते. त्यामुळे चारही प्रकार एकाच वेळी फिरत असतील, तर गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते.

संशोधनात डिइएनव्ही-२ हा प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळून आला असला अन्य प्रकार हे विविध भागांत मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे दिसून आले. काही रुग्णांमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारांचा संसर्ग झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. अशा रुग्णांमध्ये प्लेटलेट्स वेगाने कमी होणे, रक्तस्राव होणे आणि अतिदक्षता उपचारांची गरज भासण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.भारतात गेल्या काही वर्षांत डेंग्यूचा भौगोलिक विस्तारही झपाट्याने वाढला आहे. पूर्वी प्रामुख्याने पावसाळ्यापुरता मर्यादित असलेला हा आजार आता अनेक शहरांमध्ये वर्षभर आढळत आहे. हवामानातील बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस, वेगाने होणारे शहरीकरण आणि साचलेल्या पाण्याच्या वाढत्या समस्या यामुळे डासांच्या प्रजननाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे डेंग्यूचा संसर्ग अधिक काळ टिकून राहू लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक स्तरावर डेंग्यूचा सर्वाधिक भार असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. दरवर्षी लाखो संशयित रुग्णांची नोंद होत असली, तरी प्रत्यक्ष संसर्गाचे प्रमाण यापेक्षा कितीतरी जास्त असल्याचा अंदाज आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येला आयुष्यात किमान एकदा डेंग्यूचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता विविध अभ्यासांत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषाणू प्रकारांचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.

डेंग्यूवरील लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असताना या संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात कोणते विषाणू प्रकार किती प्रमाणात फिरत आहेत, याची अचूक माहिती उपलब्ध असल्यास प्रभावी लसीकरण धोरण आखणे अधिक सोपे होणार आहे. तसेच केवळ रुग्णसंख्या मोजण्याऐवजी विषाणूंच्या प्रकारांवर सातत्याने जनुकीय देखरेख ठेवण्याची आवश्यकता संशोधकांनी अधोरेखित केली आहे. तज्ज्ञांच्या मते, ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, उलट्या किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. स्वतःहून वेदनाशामक औषधे घेणे टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत. त्याचबरोबर घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, डासांची पैदास रोखणे आणि वेळेवर निदान करणे हेच डेंग्यूवरील सर्वात प्रभावी उपाय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.