Aloe Vera Benefits: आजच्या धावपळीत जीवनात पचनक्रिया बिघडणे, लिव्हरचे कमकुवत कार्य आणि त्वचेशी संबंधित समस्या सामान्य झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत फक्त शरराचे पोषण करणे पुरेसे नाही, तर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करणेदेखील महत्त्वाचे आहे. आयुर्वेदात, कोरफडीला शरीराच्या सौम्य आणि नैसर्गिक शुद्धीकरणासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही व्यक्तिमत्व डॉ. हंसा योगेंद्र यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, कोरफडीला आयुर्वेदात कुमारी म्हणतात. ही एक औषधी वनस्पती आहे. ती शरीराला आतून थंड करते आणि पित्त दोष संतुलित करण्यास मदत करते.

कोरफडीमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी१२ यासह ७५हून अधिक सक्रिय घटक असतात. त्यात एन्झाइम, खनिजे, अमिनो अ‍ॅसिड आणि पॉलिसेकेराइड्स देखील असतात. त्यात असलेले एसेमानन हे एक प्रमुख संयुग आहे. ते आतड्यांचे अस्तर मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते असे मानले जाते. कोरफडीचे सेवन लिव्हर आणि पचन कसे डिटॉक्सिफाय करते आणि शरीरासाठी त्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊ…

पचनासाठी कोरफड किती प्रभावी ठरते?

संशोधनानुसार, कोरफड केवळ अन्न पचवण्यास मदत करत नाही तर आतड्यांसंबंधी गंभीर समस्यांमध्येही आराम देते. अ‍ॅलिमेंटरी फार्माकोलॉजी अँड थेरप्यूटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या आतड्यांमधील दाहक आजारांमध्ये कोरफडचा अर्क खूप प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्यात असलेले सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि अँथ्राक्विनोन पचनसंस्थेतील जळजळ कमी करतात. त्यामुळे पोटदुखी आणि पेटके कमी होतात. कोरफडच्या पानांच्या बाहेरील थराखाली लेटेक्स नावाचा पिवळा पदार्थ असतो. त्यात अ‍ॅलोइन नावाचा घटक असतो.

राष्ट्रीय आरोग्य संस्थांनुसार, अ‍ॅलोइन हे एक शक्तिशाली रेचक आहे. ते आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवते आणि मल मऊ करते. त्यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठता दूर होते. हे जेल डिटॉक्सिफायिंग आणि पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात. ते आतड्यांमध्ये प्रीबायोटिक म्हणून काम करते, आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना (प्रोबायोटिक्स) पोषण देते. जेव्हा आतड्यांतील मायक्रोबायोम संतुलित होते तेव्हा गॅस, पोटफुगी आणि अपचन यासारख्या समस्या आपोआप कमी होतात.

जर्नल ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमधील संशोधनानुसार, अ‍ॅसिड रिफ्लुक्सची लक्षणे कमी करण्यासाठी कोरफडीचा रस काही पारंपरिक औषधांइतकाच प्रभावी असू शकतो. ते पोटातील आम्लता नियंत्रित करते आणि अन्ननलिकेतील जळजळ शांत करते.

कोरफड लिव्हरसाठी फायदेशीर

कोरफड जेल लिव्हरमधील एन्झाइम्स आणि पित्त स्त्राव यांचे संतुलन सौम्यपणे वाढवते. त्यामुळे चरबी चयापचय सुधारतो. हे जेल शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेचा निस्तेजपणा आणि जडपणा कमी होतो. आयुर्वेदानुसार, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीराची जबरदस्तीने स्वच्छता करणे नव्हे तर प्रणाली संतुलित करणे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोरफड हे लिव्हरसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे.

जर्नल ऑफ फार्माकोलॉजी अँड फार्माकोथेरप्यूटिक्समधील संशोधनात असे दिसून आले आहे की, त्यातील फायटोस्टेरॉल आणि अँटीऑक्सिडंट्स लिव्हरच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. त्याचे हेपेटोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म लिव्हरला अल्कोहोल आणि औषधांपासून होणाऱ्या हानिकारक विषारी पदार्थांपासून वाचवतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, ते लिव्हरमध्ये लिपिड संचय कमी करते. त्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर सुधापते. त्याचे दाहक विरोधी गुणधर्म जळजळ कमी करतात. आणि लिव्हरचे कार्य सुधारतात.

शरीराच्या डिटॉक्ससाठी कोरफडीचे सेवन कसे करावे?

१० ते २० मिली फूड ग्रेड अ‍ॅलोवेरा ज्यूस घ्या. ते कोमट पाण्यात मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्या. हे आठवड्यातून ४ ते ५ दिवस ६ ते ७ आठवडे घ्या आणि नंतर ब्रेक घ्या.

कोरफडीचा वापर कोणी टाळावा?

कोरफडीचा जेल काहींसाठी वरदान ठरू शकतो, तर काहींच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. गर्भवती महिला, तीव्र अतिसाराने ग्रस्त असलेल्या आणि किडनीच्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी ते टाळावे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू शकते किंवा कमकुवत होऊ शकते. तसंच जड अन्न किंवा दुधासोबत कोरफडीचे सेवन अजिबात करू नका.